जनता दरबारात कडाडले ऊर्जामंत्री

By Admin | Updated: April 26, 2017 00:49 IST2017-04-26T00:49:06+5:302017-04-26T00:49:06+5:30

एका अभियंत्याच्या निलंबनाचा प्रस्ताव, आठ अभियंत्यांची वेतनवाढ रोखली!

Power minister in the public meeting | जनता दरबारात कडाडले ऊर्जामंत्री

जनता दरबारात कडाडले ऊर्जामंत्री

बुलडाणा: वीज समस्यांवर बोलाविलेल्या जनता दरबारात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच कडाडले असून, शेतकऱ्यांना वीज जोडणी न देण्यासह कामात हलगर्जीपणा करणाऱ्या एका अभियंत्याला निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला, तर आठ अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्यात आली.
राज्याचे ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २५ एप्रिल रोजी महावितरण व महापारेषणच्या पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन केले; तसेच यानंतर ग्राहकांच्या समस्या ऐकून घेण्याकरिता जनता दरबार भरविण्यात आला. यावेळी मंचावर आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. आकाश फुंडकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, आ. संजय रायमुलकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, भाजपचे बुलडाणा विधानसभा अध्यक्ष योगेंद्र गोडे, जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले, महावितरणचे क्षेत्रीय संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांची उपस्थिती होती. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांच्या समस्या ऐकून घेत त्यावर तत्काळ संबंधित अभियंत्यांना जाब विचारण्यात आला. यादरम्यान २०१३ मध्ये अर्ज केलेले शेतकरी अभिमन्यू लहाने यांना शेतातील कृषी पंपाची वीज जोडणी न देणाऱ्या उपअभियंता चव्हाण यांच्या तीन वेतनवाढ रोखण्याचा आदेश यावेळी देण्यात आला. बुलडाणा शहरातील एका घरावरून वीज वाहिनी गेली आहे. यामुळे अपघातग्रस्त झालेल्या घरमालकाची साधी पाहणीही न करता त्याला कोणताही मोबदला देण्यात आला नाही, त्यामुळे बुलडाण्याचे कार्यकारी अभियंता विजय जिजीलवार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले; तसेच लोणारचे उपअभियंता खोकडे मुख्यालयी राहत नसल्याचे आ. संजय रायमुलकर यांनी सांगितले. त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी खोडके यांना कुठे राहता, कुणाच्या घरात राहता, घरमालकाचा मोबाइल नंबर काय? याबाबत विचारपूस केली असता, खोडके यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. परिणामी, त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्यात आल्या. तसेच राजेश मिश्रा, दीपक पाटील यांसह सहा अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्यात आली. शेतकरी व ग्राहकांनी दिलखुलास आपल्या तक्रारी मांडल्या. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. ऊर्जामंत्री अधिकाऱ्यांचे नाव घेताच त्यांची दाणादाण उडत होती. शेतकरी किंवा ग्राहकांशी उद्धट वागणारे अधिकारी ऊर्जामंत्र्यांपुढे उत्तरे देताना त-त, प-प करीत होते. अधीक्षक अभियंता कडाळे यांचीही घाबरगुंडी उडाली होती. कडाळे यांनाही बुलडाणा जिल्ह्यातील महावितरणचे ढेपाळलेले काम त्वरित सुधारले नाही, तर कारवाई करण्याचा इशारा दिला. कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई होत असल्याचे पाहत उपस्थित वीज ग्राहकांमध्येही उत्साह संचारला होता. टाळ्यांच्या कडकडाटात ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निर्णयांना दाद मिळत होती. यासोबतच या कार्यक्रमांतर्गत अनेक वीज ग्राहकांच्या तक्रारी, निवेदने व सूचना स्वीकारून त्याचे निराकरण याच कार्यक्रमात करण्यात आले.

‘अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, रोजगार हमी’ - ऊर्जामंत्री
ग्राहकांना चुकीची बिले जातात, घरात कमी विजेचा वापर झाल्यावरही अधिक रकमेचे बिल येतात. अशा प्रकारची तक्रार ग्राहकांनी केल्यावर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यावर बिल वाटप करणाऱ्या संबंधित एजन्सीची चौकशी करून सांगतो, असे उत्तर मिळाले. या उत्तरावर संतप्त होत ऊर्जामंत्र्यांनी एजन्सीची मान्यता रद्द करण्याचा आदेश दिला; तसेच आतापर्यंत का कारवाई केली नाही, याचा जाब विचारत अर्धे तुम्ही आणि रोजगार हमी असा प्रकार सुरू असल्याचे म्हणत ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

Web Title: Power minister in the public meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.