वीज अभियंत्यास घेराव
By Admin | Updated: September 8, 2015 02:19 IST2015-09-08T02:19:14+5:302015-09-08T02:19:14+5:30
खंडीत वीजपुरवठय़ाने देवपूर ग्रामस्थ संतप्त.

वीज अभियंत्यास घेराव
बुलडाणा : वीज कंपनीकडून महिन्याभरापासून खंडित असलेल्या वीज पुरवठय़ामुळे संतप्त झालेल्या देवपूरवासीयांनी हतेडी उपकेंद्राच्या वीज अभियंत्याला घेराव घालून ६ सप्टेंबर रोजी आंदोलन केले. दरम्यान शेतकर्यांची अडचण लक्षात घेता ७ दिवसात वीजपुरवठा सुरळीत करून देण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अभियंत्याने दिल्यानंतर देवपूर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. बुलडाणा तालुक्यातील देवपूर, दहिद खुर्द, माळवंडी व दुधा या गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे या गावातील जीवन प्रभावित झाले. पावसाअभावी पिकांना पाण्याची असलेली आवश्यकता वीज पुरवठय़ाअभावी शेतकर्यांना पूर्ण करता आलेली नाही. अनेक शेतातील उभे पीक करपले आहे. या पार्श्वभूमीवर सदर गावातील संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सुनील तायडे, अनिल वारे, रघुनाथ नरोटे, संजय सोनुने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले देवपूर गावठाण फिडरचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, तसेच सतत गैरहजर राहणारे वीज कर्मचारी मेहत्रे व शेख आरीफ यांना निलंबित करावे, या मागण्यांसाठी वीज अभियंता इंगळे यांना घेराव घालण्यात आला; तसेच जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला, तथापि सदर मागण्या ७ दिवसात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन विभागाने ग्रामस्थांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले; तसेच या सर्व गैरव्यवस्थापनास जबाबदार असलेले वीज अभियंता गायकवाड यांच्यावरसुद्धा कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी रेटली; तसेच वीज विभागाच्या दिरंगाईमुळे कोणत्याही शेतकर्याने नैराश्येपोटी काही विपरीत प्रकार केल्यास त्याची जबाबदारी वीज विभागाची राहील, असा इशारासुद्धा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात उमाकांत वारे, कडूबा दोतोंडे, प्रभाकर वाघ, शिवानंद जाधव, कारभारी वारे, विजय पवार, आस्तिक वारे, गणेश नरोटे, भगवान वारे, राजेंद्र दोतोंडे, विजय नरोटे, अमोल वारे, पवन वारे, रामेश्वर वारे, संदीप जाधव, संतोष वारे, ब्रम्हानंद वारे व देवपूर, दहिद खुर्द, माळवंडी तसेच दुधा ग्रामस्थ सहभागी झाले.