देऊळघाट येथे पुन्हा पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:05+5:302021-04-24T04:35:05+5:30
धाड येथे वाढले कोरोना रुग्ण धाड : येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. २२ एप्रिल रोजी धाड येथे ...

देऊळघाट येथे पुन्हा पॉझिटिव्ह
धाड येथे वाढले कोरोना रुग्ण
धाड : येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. २२ एप्रिल रोजी धाड येथे चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गावात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष केंद्रित केले आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे
किनगावराजा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक संचारबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रसार टाळण्यास मदत होईल.
रसवंती बंद झाल्याने नुकसान
दुसरबीड : संचारबंदीमुळे ऊस पिकाचे नुकसान होत आहे. साखर कारखान्याला ऊस देता येत नाही. ऊसतोडणी मजूरसुद्धा मिळत नाही. रसवंतीही बंद झाल्याने त्या व्यावसायिकांनी करार सोडून दिले आहेत. यामुळे ऊस उत्पादकांना फटका बसला आहे.
मंडप व्यावसायिकांना फटका
बीबी : संचारबंदीचा फटका मंडप व्यावसायिकांना बसला आहे. ऐन सिझनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. व्यावसायिकांना शासनाकडून मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे रखडली
लोणार : शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे रखडली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण झाली नाही, तर पावसाचे पाणी तुंबून रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील अन्य सफाईची कामे करण्याबाबत आरोग्य विभागाने तत्काळ नियोजन करून कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी धरली तंत्रज्ञानाची कास
मेहकर : तालुक्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. उमरा शिवारात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत पिकाची लागवड करण्याकरिता पूर्वतयारी सुरू आहे. यासाठी ठिबक सिंचन व मल्चिंगचा वापर करण्यात येत आहे.
परवाना नसलेल्यांना निविष्ठांना बसणार आळा
सिंदखेडराजा : तालुक्यात मागील वर्षी परवाना नसलेली काही खते व औषधींची विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. निदान, या वर्षी असा प्रकार होऊ नये म्हणून याकडे या समितीला लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे परवाना नसलेल्या निविष्ठांना आळा बसू शकेल.
‘डोअर टू डोअर’ टरबूज विक्री वाढली
बुलडाणा : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या ‘डोअर टू डोअर’ भाजीपाला व फळांची शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असून ग्राहकांनाही चांगली फळे व भाजीपाला मिळत आहे. शिवाय, या वस्तू घेण्यासाठी नागरिकांना बाहेर जाण्याची गरज नाही. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यास मदत होत आहे. स्वत:सह परिवाराचा या भीतिदायक आजारापासून बचाव होत आहे.
ज्वारी पीक बहरले
बीबी : परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सिंचनाची सोय झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी हायब्रीडचे पीक घेतले. सध्या ज्वारीचे पीक चांगलेच बहरलेले आहे.
ग्राहक सेवा केंद्र बंद
बुलडाणा : स्टेट बँक ग्राहक केंद्र बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. पैसे काढणे, पैसे टाकणे व इतर बँकिंग सुविधेपासून ग्राहक वंचित राहत आहेत. ग्रामीण भागातील ग्राहक सेवा केंद्रामध्ये सध्या जास्त अडचणी निर्माण झाल्या आहेत.