लोंबकळलेल्या वीज तारा ठरताहेत धोकादायक!
By Admin | Updated: April 10, 2017 00:26 IST2017-04-10T00:26:18+5:302017-04-10T00:26:18+5:30
उघडे विद्युत रोहित्र : विद्युत वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार

लोंबकळलेल्या वीज तारा ठरताहेत धोकादायक!
उद्धव फंगाळ - मेहकर
सध्या मेहकर शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी उघडे असलेले रोहीत्र व घरांवर लोबंकाळलेल्या विजेच्या तारांमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देउन उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
मेहकर येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाररामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिटर रिंडीग न तपासता तसेच त्या मिटर वरून विजेचा किती वापर होेतो, याची कोणतीही शहानिशा न करता मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा विद्युत बिले देण्यात येत आहेत. यामुळे गोरगरीब ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मात्र काही विद्युत ग्राहकांचा विजेचा वापर जास्त असतांनाही त्या विभागाचे संबंधित अधिकारी तथा लाईनमन यांचे हितसंबंध असल्याने अनेक बिले कमी जास्त प्रमाणात देण्यात येत आहेत.
अशा प्रकारामुळे विद्युत वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागात सध्या भुईमुंग, कांदा, भाजीपाला, आदी पिकांसाठी पाण्याची गरज आहे. अशा पिकांना पाणी देण्यासाठी २४ तासामधून केवळ ७ ते ८ तास विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. भारनियमनाच्या नावाखाली तासन-तास विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच एखाद्या वेळेस शॉट-सर्किट व इतर कारणामुळे कृषी पंपाची वीज बंद पडल्यास दोन-दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही.
संबंधित विभागाचे अधिकारी तथा लाईनमन यांचेकडे वीज जोडण्याची मागणी अथवा तक्रार केल्यास केवळ उडवा-उडवीची उत्तरे मिळते, तर जाणीपुर्वक व खोडसाळपणाने विज जोडण्यात येत नाही. शेतकऱ्यांना नाईलास्तव खासगी लाईनमनला पैसे देउन विज जोडून घ्यावी लागते. अनेक शेतामध्ये विजेचे तार लोंबकाळलेले आहेत. तर विजेचे खांब वाकलेल्या परीस्थीत आहेत. तसेच रोहित्र उघडेच असल्याने नागरीकांच्या जिवीत्वास धोका निर्माण झालेला आहे.या संदर्भात विज वितरण कंपनीकडे तक्रारी करूनही कारवाई तर होतच नाही व कामही होत नाही. केवळ कागदीघोडे नाचवण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्ग, सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत.
विज वितरण कंपनी संदर्भात लोकप्रतिनिधी सुद्धा उदासीन दिसत असुन नेमका न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना पडला आहे. विज वितरण कंपनीच्या मनमानी धोरणामुळे नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्युत वितरणच्या या कामाकडे लक्ष घालून शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.