अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:42+5:302020-12-29T04:32:42+5:30
दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील देऊळगाव कोळपासून तर सिंदखेड राजानजीकच्या सावरगाव माळपर्यंत समृद्धी महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. त्यासाठी ...

अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था
दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील देऊळगाव कोळपासून तर सिंदखेड राजानजीकच्या सावरगाव माळपर्यंत समृद्धी महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे तालुक्यातील कमी वजन पेलण्याची क्षमता असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वजन पेलण्याची क्षमता वाढवत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे देऊळगाव कोळ येथून बीबी, ता. लोणार येथे जाण्यासाठी असलेल्या सहा किलोमीटर मार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. अशीच परिस्थिती इतर गावांच्या रस्त्याची झाली आहे. त्यामुळे वाहने तर सोडा साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. बीबी येथून पाच किलोमीटर तर देऊळगाव कोळ येथून एक किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यावर रात्रंदिवस सुरू असलेल्या अवजड वाहनांमुळे मार्गावरील देऊळगाव कोळ व कुंबेफळ येथील ग्रामस्थांची प्रवासाची अडचण तर होतेच; परंतु या वाहनांच्या बेदरकार वेगामुळे जिवालाही धोका निर्माण होतो. या सर्व प्रकारांना कंटाळून कुंबेफळ येथील ग्रामस्थांनी यापूर्वीही जड वाहने अडविली होती. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देत शासन तुमच्यावर कारवाई करू शकते, अशा प्रकारची भाषा वापरून गर्भित धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यातून पुन्हा या वाहनांचा हैदोस सुरू झाला. दरम्यानच्या काळात देऊळगाव कोळ येथील सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर काळुसे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांना भ्रमणध्वनीद्वारे जनतेला होत असलेला त्रास कथन केला होता. त्यावेळी या प्रकरणात आपण लक्ष घालू, असे आश्वासनही यांनी दिले होते; मात्र त्याचवेळी त्यांची बदली झाली व काहीच निष्पन्न झाले नाही. तेव्हापासून आजतागायत अवजड वाहतूक व त्यातून रस्ता खराब होण्याचा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे देऊळगाव कोळ, कुंबेफळ मार्गे बीबीपर्यंतच्या रस्त्याची अवजड वाहतूक पेलवता येईल, अशा नियोजनातून दुरुस्ती करून देण्याची मागणी केली जात आहे.
ग्रामस्थांनी दिला आंदाेलनाचा इशारा
लवकरात लवकर जर दुरुस्ती कामाला सुरुवात झाली नाही तर देऊळगाव कोळ व कुंबेफळ येथील ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशाराही रामेश्वर काळुसे यांनी दिला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.