जांभोरा ते रूम्हणा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:15+5:302021-09-23T04:39:15+5:30
जालना, नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील राहेरी येथील खडकपूर्णा नदीवरील पुलाचे काम चालू आहे. त्यामुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली ...

जांभोरा ते रूम्हणा रस्त्याची दुरवस्था
जालना, नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील राहेरी येथील खडकपूर्णा नदीवरील पुलाचे काम चालू आहे. त्यामुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, जांभोरा रूम्हणा चांगेफळ यामार्गे वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत. तरीसुद्धा या रस्त्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.
जांभोरा ते रुह्मणा रस्ता जोडतो मराठवाड्याला
जांभोरा ते रूम्हणा हा रस्ता मराठवाडा हद्दीला जोडला जातो. या रोडवर सोयंदेव, देवखेड, रूम्हणा, तांदुळवाडी, चांगेफळ, बेलोरा, चौफुली जयपुर, मंठामार्गे नांदेड, परभणी महामार्गाला जोडला जातो. अनेकांना रोज बाजारपेठ आणि दैनंदिन तसेच सरकारी कामासाठी तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे यावे लागते. तर जालना, औरंगाबाद शहरातील मोठमोठ्या दवाखान्यात रुग्णांना घेऊन उपचारासाठी याचमार्गाने जावे लागते. त्यामुळे या रस्त्याने मोठी वर्दळ असते.
रस्ता दुरुस्तीची मागणी
गेली दोन वर्षांपासून जांभोरा गावालगत रूम्हणा रोडवर असलेल्या गजानन महाराज मंदिरापर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्यामुळे अनेक अपघातही यापूर्वी घडले आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये रोष निर्माण होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.