पूल, रस्त्याचे रखडलेले डांबरीकरण करण्यात यावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:43+5:302021-02-05T08:31:43+5:30
तालुक्यातील सोमठाणा फाटा ते सोमठाणा या रस्त्याचे २०१९ मध्ये डांबरीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास ...

पूल, रस्त्याचे रखडलेले डांबरीकरण करण्यात यावे!
तालुक्यातील सोमठाणा फाटा ते सोमठाणा या रस्त्याचे २०१९ मध्ये डांबरीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, बुलडाणा) यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. मात्र, दीड वर्षाचा कालावधी उलटूनही हा रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. यामध्ये रस्त्यावरील दोन पुलांचा समावेश असून गावाजवळील नदीला पूर आल्यास गावाचा संपर्क तुटत असल्याने त्या पुलाचे तातडीने काम पूर्ण करावे, संबंधित विभागाकडून पाहणी करून तसे अंदाजपत्रकसुद्धा सादर करण्यात आलेले होते. जे काम झालेले आहे ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कामासंदर्भात असलेल्या निकषांना धरून आहे का? तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. ही कामे मनमानी पद्धतीने सुरू असल्याने याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून काम अर्धवट अवस्थेत असताना त्या फलकावर काम पूर्णत्वाची तारीख टाकून देखभाल दुरुस्तीच्या पाच वर्षाच्या जबाबदारीपासून पळवाट शोधली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतर ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने ग्रामस्थांसमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन रस्ता डांबरीकरण काम व पुलाचे बांधकामास त्वरित सुरुवात करण्यात यावी, आजपर्यंत झालेल्या कामाची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांची पूर्तता होऊन रस्ता कामास सुरुवात न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी रविराज टाले, अविनाश झगरे, गणेश झगरे, अच्युतराव वाघमारे, पुरुषोत्तम कावळे, छोटू झगरे, सुदर्शन वाघमारे, गोटू वाघमारे, भास्कर वाघमारे, शिवाजी झगरे, पंडित झगरे आदी उपस्थित होते.