राजकीय उलथापालथ
By Admin | Updated: September 28, 2014 00:38 IST2014-09-28T00:38:23+5:302014-09-28T00:38:23+5:30
बुलडाणा जिल्ह्यातही राजकीय उलथापालथचे पडसाद अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आले.

राजकीय उलथापालथ
बुलडाणा: महायुती-आघाडीच्या फुटीनंतर सुरू झालेल्या राजकीय उलथापालथचे पडसाद आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आले. काँग्रेसच्या नेत्यांनी दुसर्या पक्षांसोबत केलेला घरोबा, एबी फॉर्मचा खेळखंडोबा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले.
* राष्ट्रवादी : उमेदवारीसाठी धावाधाव
जळगाव जामोदच्या माजी नगराध्यक्ष डॉ.स्वाती वाकेकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली त्यामुळे राष्ट्रवादीने ऐनवेळी धावाधाव करीत काँग्रेसचे प्रकाश ढोकणे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी दिली. मेहकरमध्ये अश्विनीं आखाडे यांच्या ऐवजी मंदाकिनी कंकाळ यांचे नाव सकाळी जाहीर झाले; मात्र ए.बी.फॉर्म कुणाजवळ हा गोंधळ दुपारपर्यंंंत कायम होता, अखेर अश्विनी आखाडे यांना ए.बी.फॉर्म देण्यात आला. मलकापूरचाही राष्ट्रवादीचा उमेदवार बदलणार, अशी अफवा होती; मात्र संतोष रायपुरे यांनाच ए.बी. फॉर्म मिळाला.
* भाजपा : एबी फॉर्मचा गोंधळ
युती तुटल्यानंतर उमेदवाराच्या शोधासाठी भाजपाला सर्वत्र धावाधाव करावी लागली. बुलडाण्यात अँड.व्ही.डी.पाटील हे उमेदवार जाहीर झाले व ते अर्ज भरण्याची तयारी करीत असतानाच योगेंद्र गोडे यांचे नाव समोर आले. त्यामुळे एबी फॉर्मचा काहीकाळ गोंधळ उडाला होता; मात्र गोडे यांना उमेदवारी मिळाली. अँड. पाटील हे सुद्धा रिंगणात आहेत.तर मेहकरमध्ये रिपाइं आठवले गटाच्या नरहरी गवई यांच्या गळयात उमेदवारीची माळ पडली. सेनेच्या कोटयातून जि.प.सदस्य असलेले गवई आता भाज पाच्या युतीमध्ये मेहकरचे उमेदवार ठरले आहेत.
* शिवसेना : डमी उमेदवारांचे अर्ज
चिखली, खामगाव येथे शिवसेनेकडून दोन दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चिखलीत जालींधर बुधवत व डॉ.प्रतापसिंग राजपूत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून खामगावातही माजी जिल्हाप्रमुख ज्ञानदेवराव मानकर व हरिदास हुरसाड हे रिंगणात आहेत. शिवसेनेने जळगाव जामोद मतदारसंघामध्ये शेगावच्या संतोष घाटोळ यांना उमेदवारी दिली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत कायम होता. उमेदवार बदलविल्या जाणार असल्याची चर्चा होती; मात्र घाटोळ यांची उमेदवारी कायम राहिली.
* स्वाभिमानी भाजपासोबत
महायुतीमध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महत्वाकांक्षेचा वारू अखेर शांत झाला आहे. चिखली या संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपामध्ये असलेली उमेदवारीची प्रचंड स्पर्धा पार करीत सुरेश अप्पा खबुतरे यांनी उमेदवारीसाठी बाजी मारली त्यामुळे स्वाभिमानी बंडखोरी करणार अशी अटकळ होती परंतु या संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी माघार घेत भाजपासोबत राहण्याचे पत्रकार परिषदेत जाहिर केले.
* शिंगणेंचा अर्ज नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तब्बल दोन दशकांपासून सिंदखेडराजा मतदारसंघाचे प्रतिनिेधीत्व केले आहे. १९९५ मध्ये अपक्ष आमदार म्हणून प्रथम विजयी झालेले डॉ.शिंगणे यांनी राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व सांभाळले. यावेळी ते पाचव्यांदा रिंगणात राहणार होते; मात्र त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारी निवड प्रक्रियेपासूनच अंतर राखले होते, त्यामुळे ते लढणार नाहीत, अशी चर्चा होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. डॉ.शिंगणे यांनी सिंदखेडराजा किंवा बुलडाण्यातही अर्ज दा खल केला नाही, त्यामुळे गेल्या २0 वर्षानंतर प्रथमच रिंगणाबाहेर राहिले आहेत.