बंदोबस्तासाठी पोलिसांची होणार दमछाक
By Admin | Updated: September 26, 2014 00:10 IST2014-09-26T00:10:29+5:302014-09-26T00:10:29+5:30
निवडणूक व नवरात्रोत्सवाचा पोलिसांवर अतिरिक्त ताण.

बंदोबस्तासाठी पोलिसांची होणार दमछाक
बुलडाणा : सण, उत्सवांच्या काळात अनुचित प्रकार घडू नये, शांतता-सुव्यवस्था कायम राहावी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येतो. शहरासह ग्रामीण भागात शांतता राखण्यासाठी पोलिस तैनात केले जातात. गुरुवारपासून नवरात्रीस प्रारंभ होत असून, दसरा व त्यातच निवडणुकीची धामधूम राहणार आहे. हा तिहेरी संगम सांभाळताना पोलिसांची चांगलीच दमछाक होणार आहे.
नवरात्री व दसर्याच्या काळात भाविकांची सर्वत्र गर्दी असते. त्यासाठी पोलिसांची गरज पडते. यानंतर विधानसभा निवडणुका असल्याने पोलिसांचे दडपण नक्कीच वाढणार आहे. आता विधानसभा निवडणुकीचा राजकीय फड रंगणार आहे. या सर्व बाबींमुळे कायदा व सुव्यवस्था राखणार्या पोलिसांची दमछाक होणार असून, ताणही वाढणार आहे. यामुळे या काळात अतिरिक्त पोलिस मनुष्यबळाची नितांत गरज भासणार आहे. जिल्ह्यातील नवरात्रीत महिलांसह पुरुषही आदिशक्तीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. नवरात्री आणि दसर्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीही माजणार आहे. शिवाय आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यासाठीही पोलिसांना लक्ष ठेवावे लागणार आहे. विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, प्रचारकांची रेलचेल, मिरवणुका यावरही पोलिसांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
यात पोलिसांना अधिक श्रम खर्ची घालावे लागणार असून, निवडणुकीसाठी जिल्ह्यात येणार्या पैशावरही पाळत ठेवावी लागणार आहे. आता पोलिस यंत्रणा नवरात्री, दसरा आणि निवडणुकांचा कार्यक्रम कसा हाताळते, याकडेच सर्वांचे लक्ष राहणार आहे.