पोलिसांनी घेतली आरोपीच्या घराची झडती
By Admin | Updated: October 7, 2015 23:50 IST2015-10-07T23:50:04+5:302015-10-07T23:50:04+5:30
देशी कट्टा प्रकरणाचा तपास एपीआयकडे वर्ग होण्याचे संकेत.
_ns.jpg)
पोलिसांनी घेतली आरोपीच्या घराची झडती
संग्रामपूर (जि. बुलडाणा): चार देशी कट्टे व तीन जिवंत काडतुसासह अटक करण्यात आलेल्या संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथील रूपसिंग भरपूरसिंग टाक याच्या घराची तामगाव पोलिसांनी ७ ऑक्टोबर रोजी झडती घेतली. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक परदेशी यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने रूपसिंगला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्याप चौकशीत त्याने काही गोष्टी उघड केल्या नसल्या तरी त्याच्याकडून अवैध शस्त्रनिर्मिती संदर्भातील अनेक गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सध्या या प्रकरणाचा तामगाव पोलीस तपास करीत आहेत. तामगाव पोलिसांनी ५ ऑक्टोबर रोजी लाडणापूर शिवारात छापा मारून रूपसिंग टाक यास अटक केली होती. २६ वर्षीय रूपसिंगकडून त्यावेळी चार देशी कट्टे व तीन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले होते. जळगाव जामोद न्यायालयाने त्याची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली होती. दुसरीकडे मध्यप्रदेशाच्या सीमेलगत असलेल्या पचौरी येथील अवैध शस्त्रनिर्मिती करणार्यांशी त्याचा संबंध आहे का, चार देशी कट्टे व तीन जीवंत काडतुसे घेऊन तो कोठे जात होता, त्याच्यासोबत या गुन्ह्यात आणखी काही जण आहेत का, या दिशेने सध्या तामगाव पोलीस तपास करीत आहेत.