बाजार समितीच्या मतदानादरम्यान काँग्रेस-भाजपमध्ये राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज
By सदानंद सिरसाट | Updated: April 28, 2023 19:25 IST2023-04-28T19:21:57+5:302023-04-28T19:25:50+5:30
मतदान केंद्रात तणाव : मतदारांना केंद्रात घेऊन जाण्यावरून वाद

बाजार समितीच्या मतदानादरम्यान काँग्रेस-भाजपमध्ये राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज
खामगाव - मतदारांना मतदान कक्षापर्यंत घेऊन जाण्याच्या कारणावरून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मतदान प्रक्रियेदरम्यान खामगाव येथील मतदान केंद्राबाहेर भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. यावेळी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
खामगाव कृउबासच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. शहरातील जिल्हा परिषद शाळेतील तीन मतदान केंद्रांत सकाळपासूनच गर्दी झाली होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजप व काँग्रेस कार्यकर्ते गोळा झाल्याचे दिसून आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मतदारांना वाहनाद्वारे मतदान केंद्राच्या गेटपर्यंत घेऊन येत असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला, तसेच ते कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावरून पोलिस व त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यावेळी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनीही पोलिसांना जाब विचारला. त्यानंतर दुपारी १२ वाजेदरम्यान मतदान सुरू असताना काही काँग्रेस कार्यकर्ते मतदारांना मतदान कक्षापर्यंत घेऊन जात होते. त्यामुळे भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बोलाचाली झाली.
हा राडा सुरू असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज करत वाद घालणाऱ्या सर्वांना मतदान केंद्र परिसराच्या बाहेर काढले. या प्रकारामुळे काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर काही वेळाने पुन्हा मतदान केंद्राबाहेर रोडवरही वाद झाला होता. अशा तणावाच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली.