महिला सुरक्षेसाठी पोलिसांचा आय वॉच
By Admin | Updated: June 27, 2014 00:27 IST2014-06-26T23:35:43+5:302014-06-27T00:27:27+5:30
विशेष सॉफ्टवेअर : बटन दाबताच पीडित महिलेस सुरक्षा!

महिला सुरक्षेसाठी पोलिसांचा आय वॉच
नीलेश शहाकार/बुलडाणा
राज्यात महिलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाने महिलांच्या सुरक्षेच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. त्यासाठी पोलिसांनी आय वॉच हे नवे मोबाईल सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे. लहान मुले आणि वृद्धांनाही याचा फायदा होणार आहे.
महाविद्यालयीन, शाळकरी मुली, नोकरदार महिला तसेच पर्यटक महिलांवर अ त्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे. नवे सॉफ्टवेअर महिलांच्या सुरक्षेबाबत फायदेशीर ठरणारे आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पीडित महिलेस घटनास् थळाचा तसेच आरोपीचा व्हिडिओ आणि मदतीचा संदेश कळ दाबताच थेट पोलिस नियंत्रण कक्षास आणि तिच्या नातेवाईकांना पाठवता येईल. या मोबाईल अँप्लिकेशनद्वारे येणार्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष कक्ष स्थापण्यात येणार आहे.
आजकाल बहुतांश महिलांकडे स्मार्टफोन आहे. या फोनवर हे अँप्लिकेशन सहज डाऊनलोड होऊ शकते. बटन दाबताच मोबाईल फोनचा कॅमेरा ऑन होऊन चित्रीकरण सुरू होते. हे चित्रीकरण बटन दाबताच थेट नियंत्रण कक्षाकडे पोहोचेल. जीपीएसचा वापर करुन पीडित महिलेचे स्थळ आपोआप नियंत्रण कक्षास कळू शकणार आहे. यानंतर विशेष कक्षातील कर्मचारी आवश्यक ती मदत संबंधित पीडित महिलेला तातडीने देऊ शकतील. पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर या नव्या सॉफ्टवेअरची माहिती उपलब्ध आहे.