बालकाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आरोपीच्या शोधात

By Admin | Updated: July 2, 2016 01:16 IST2016-07-02T01:16:51+5:302016-07-02T01:16:51+5:30

चिमुकल्याचा मृतदेह गुरूवारी विहीरीमध्ये आढळला होता.

Police in connection with the death of the child in search of the accused | बालकाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आरोपीच्या शोधात

बालकाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आरोपीच्या शोधात

खामगाव : दोन वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळल्याची खळबळजनक घटना गुरुवारी टेंभुर्णा शिवारात उघडकीस आली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलीस मृत बालकाचे माता-पिता व आरोपीच्या शोधात लागले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील टेंभुर्णा शिवारात गुरुवारी विहिरीमध्ये दोन वर्षीय बालकाचा मृतदेह दिसून आला. याप्रकरणी अनोळखी इसमाने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विहिरीत टाकल्यावरून ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३0२, २0१ भादंविप्रमाणे गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शुक्रवारी त्या मृत बालकाचे सकाळी शवविच्छेदन करून पोलिसांनी अंत्यसंस्कार करवून घेतले. बालक हरविल्याबाबत अद्याप पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद नसल्याने पोलिसांनी मृताच्या माता-पित्याचा तसेच आरोपींचा शोध सुरू केला आहे. मृत बालकाबाबत माहिती असल्यास खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिंद्र शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक संजय निकुंभ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. चिमुकल्यास हातपाय बांधून व कमरेला दगड बांधून विहिरीत टाकण्यात आल्याचे दिसून आले. यावरून हा खूनच असल्याचे सिद्ध होत आहे. मृताची ओळख पटण्यासाठी डीएनए चाचणी होणार असून, अवयव नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Police in connection with the death of the child in search of the accused