एटीएम फोडणाऱ्या टोळीचे कनेक्शन शोधण्यात पोलीस व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST2021-08-01T04:32:14+5:302021-08-01T04:32:14+5:30

विशेष म्हणजे चिखली-खामगाव या मार्गावरील तीन गावांतील स्टेट बँकेचे मात्र आऊट सोर्सिंगद्वारे दिले गेलेले एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून ...

Police are busy finding the connection of the ATM burglar gang | एटीएम फोडणाऱ्या टोळीचे कनेक्शन शोधण्यात पोलीस व्यस्त

एटीएम फोडणाऱ्या टोळीचे कनेक्शन शोधण्यात पोलीस व्यस्त

विशेष म्हणजे चिखली-खामगाव या मार्गावरील तीन गावांतील स्टेट बँकेचे मात्र आऊट सोर्सिंगद्वारे दिले गेलेले एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातून तब्बल ५६ लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. चिखलीनजीकचे शेलूद येथून २७ लाख २२१ रुपये, उंद्री येथील एटीएममधून ९ लाख ९६ हजार आणि पळशी येथील एटीएममधून १९ लाख रुपये ३० जुलै रोजीच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रासह, पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मेहकर, लोणार तालुक्यातीलही एटीएम गेल्या वर्षी फोडण्याचा चोरट्यानी प्रयत्न केला होता. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तो फसला होता.

--सीसीटीव्ही फुटेजची तपासणी--

या तिन्ही ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सध्या पोलीस करत आहेत. यातून एटीएम फोडणाऱ्या टोळीचे काही धागेदोरे मिळतात का? याची पाहणी सध्या पोलीस करत आहेत. तपासाच्या दृष्टीने काही बाबी अद्यापही पोलिसांनी गोपनीय ठेवलेल्या आहेत.

--चोरीची पद्धत सारखीच--

तिन्ही एटीएम गॅस गटरच्या साहाय्याने फोडून त्यातील रोख रक्कम पळविण्याची या चोरट्यांची पद्धत सारखीच आहे. त्यामुळे तिन्ही ठिकाणी एकाच टोळीने ही चोरी केली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे चोरट्यांच्या या मोडस ऑपरेंडीचा अभ्यास करून काही धागा मिळतो का? याचाही अभ्यास पोलीस करत आहेत.

--दिल्ली, हरियाणातील टोळीवर नजर--

दिल्ली, हरियाणा राज्यातील सीमावर्ती भागातील काही गावखेड्यात एटीएम फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. चोरीची एकंदर कार्यपद्धती पाहता या भागातील टोळीचे तर हे काम नाही ना? या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. नाही म्हणायला गुजरात-राजस्थान राज्याच्या सीमावर्ती भागातील एका टोळीने बुलडाणा जिल्ह्यातून ट्रॅक्टर चोरीचा सपाटा लावला होता. त्याच धर्तीवर ही एटीएम फोडणारी टोळी तर जिल्ह्यात सक्रिय झाली का? याबाबतही पोलीस तपासणी करत आहेत.

--स्टेट बँकेत ४० पेक्षा अधिक एटीएम--

स्टेट बँकेअंतर्गत आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून जवळपास ४० पेक्षा अधिक एटीएम जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एका व्यवस्थापकाचीही नियुक्ती केली गेली आहे. विशेष म्हणजे या एटीएमवर असलेले सुरक्षारक्षकही मधल्या काळात काढून घेण्यात आलेले आहेत. त्याचाच फायदा या टोळीने घेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Police are busy finding the connection of the ATM burglar gang