स्वातंत्र्य सैनिक स्मृतिस्थळांची दुर्दशा
By Admin | Updated: November 9, 2014 23:18 IST2014-11-09T23:18:57+5:302014-11-09T23:18:57+5:30
मलकापूर येथील स्वांतत्र्य सैनिकांचे स्मृतिस्थळ आले मोडकळीस.

स्वातंत्र्य सैनिक स्मृतिस्थळांची दुर्दशा
हनुमान जगताप / मलकापूर
ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले, वेळप्रसंगी प्राणाची बाजी लावली, अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींची मलकापूर शहरात अक्षरश: थट्टा सुरू असल्याचे भयावह चित्र आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती चिरकाल कायम राहाव्या, यासाठी शासनाने स्मारके उभारली असली तरी लालफीतशाहीत प्रशासनाचेच त्याकडे दुर्लक्ष असल्याने आमच्या पूर्वजांनी बलिदान करून पाप केलं की काय, अशी भावना स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांमध्ये व्यक्त होत आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी देशातील कोट्यवधी व्यक्ती पुढे आल्या. वेळप्रसंगी स्वत:च्या प्राणांची आहुती त्यांनी दिली. त्याच बलिदानापोटी देश स्वातंत्र्य झाला अन् आजची पिढी स्वा तंत्र्यात जगत आहे. त्या लढय़ात ज्यांनी बलिदान दिले, त्यांचा आदर्श युवा िपढीसमोर राहावा, यासाठी शासनाने स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके देशभरात उभारली आहेत. त्याच धर्तीवर विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरातही स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके, एक नव्हे तीन ठिकाणी, उभारण्यात आली आहेत. त्यात तहसील चौकातील हुतात्मा पुंडलिक मराठा स्मारक, लायब्ररी मैदानातील जयस्तंभ स्मारक व गांधी चौकातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मृती स्मारक अशा तीन स्मारकांचा समावेश आहे.
एकेकाळी तरुणाईने स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींचा आदर्श घ्यावा, अशी भावना शासनाची होती. आता मात्र त्या स्मारकांची पार वाट लागलीय. स्मारकाभोवती घाणीचे साम्राज्य, सभोवताली जनावरांचा मुक्त संचार यांखेरीज मटका, जुगार यासाठी स्मारकांचा सर्रास वापर होत आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणार्या स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके शोभेची वस्तू नव्हे. तथापि, एक प्रकारे त्यांची थट्टा सुरू असल्याचे चित्र येथे आहे.