शेगाव रोडवरील झाडे सुकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:44 IST2017-04-21T00:44:55+5:302017-04-21T00:44:55+5:30
खामगाव : ऐन उन्हाळ्यात पाणी देणे थांबवल्याने शेगाव रोडवरील सुमारे २ हजार झाडे सुकत चालली आहेत.

शेगाव रोडवरील झाडे सुकली!
पाणी देणे सोडल्याने शेवटची घटका मोजत आहेत झाडे
खामगाव : शेगाव रोडवरील सुमारे २ हजार झाडे शेवटची घटका मोजताना दिसत आहेत. रस्ता रुंदीकरण कामात ही झाडे जाणार असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून ऐन उन्हाळ्यात या झाडांना पाणी देणे थांबवल्याने झाडे सुकत चालली आहेत.
सामाजिक वनिकरण विभागाच्यावतीने शेगाव रोडवर दोन-तीन वर्षाअगोदर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. या झाडांना नियमीत पाणी देवून जगविण्यातही आले. यावर लाखो रुपयांचा खर्च झाला. ही झाडे चांगली पुरुषभर उंचीची झालेली असून भविष्यात चांगली वाढली असती. परंतु खामगाव-शेगाव मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित होवून त्याचे तीनपदरीकरणाचे कामही केंद्र शासनाकडून मंजूर झाले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या या कामात झाडांचे बलिदान जाणे निश्चित आहे. सदर बाबीमुळे या झाडांच्या संगोपनाकडे संबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात आले असून पाणी देण्याचे काम थांबविलेले आहे. त्यामुळे ही झाडे पार सुकली असून आजच दम तोडत असल्याचे दिसून येते. चांगली जगलेली झाडे सुकल्याचे पाहून पर्यावरण व निसर्गपे्रमी मात्र दु:ख व्यक्त करताना दिसतात. सदर झाडे तोडलीच जाणार असल्याने आत सुकू दिली तरी भविष्यात पुन्हा लागवड व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वारकऱ्यांसाठी झाडांची आवश्यकता
शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची खामगाव-शेगाव रोडवर नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे भाविकांना विसाव्याकरिता सावलीची गरज भासते. कोणत्याही रस्त्यावर नसेल एवढी झाडांची या रस्त्यावर गरज आहे. त्यामुळे येथील झाडे सुकू न नष्ट होत असतील किंवा तोडली जात असतील तर ते पुन्हा लावणेही गरजेचे आहे.
पर्यावरणासोबतच आर्थिक हानी
शासनाकडून पर्यावरणाच्या नावाखाली नेहमी वृक्षलागवडीचे मोठ-मोठे उपक्रम राबविले जातात. त्यावर पैसा ही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तीच झाडे तोडली जातात. रस्ता बांधल्यानंतर पुन्हा एकदा वृक्षारोपण केलेच जाईल. त्यामुळे झाडे लावणे व तोडण्याच्या या उरफाट्या कामात पर्यावरणासोबतच आर्थिक हानी होत असल्याचे दिसून येते.