नियोजन आराखड्यात भर पडणार
By Admin | Updated: February 7, 2015 02:24 IST2015-02-07T02:24:55+5:302015-02-07T02:24:55+5:30
मुबंई येथील बैठकीत जिल्हाप्रशासनाच्यावतीने १0१ कोटी ७३ लाखाची मागणी; नियोजन आराखड्यात आणखी निधीची भर पडण्याची शक्यता.

नियोजन आराखड्यात भर पडणार
बुलडाणा : जिल्हा नियोजन व विकास समितीने जिल्ह्यासाठी सर्वसाधारण योजनेंतर्गत १६१ कोटी ४५ लाखाचा आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यातील योजना राबविण्यासाठी विविध यंत्रणांना आणखी निधी हवा असल्याने आज ६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाने वाढीव निधीचा विकास आराखडा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडला. या बैठकीत १0१ कोटी ७३ लाखाची मागणी करण्यात आली असून नियोजन आराखड्यात आणखी निधीची भर पडण्याची शक्यता बळावली आहे.
आज मुंबई येथे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल तथा बुलडाण्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा नियोजन अधिकारी गेडाम आदी उपस्थित होते. जिल्ह्यासाठी वित्तमंत्र्यांकडे वाढीव १0१ कोटी ७३ लाखाची मागणी केली आहे. वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी वित्त विभागाला याबाबत सूचना केली असून, जिल्हा नियोजन आराखड्यात भरीव वाढ होण्याचे संकेत आहेत.