Planning for supply of foodgrains to damaged areas | नुकसानग्रस्त भागात धान्य पुरवठ्याचे केले नियोजन

नुकसानग्रस्त भागात धान्य पुरवठ्याचे केले नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अति पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागात अन्नधान्याचा तुटवडा पडू नये, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने योग्य ती तडजोड केलेली आहे. धान्य वितरणासाठी पुरवठा विभागाने पुर्वतयारी केली असून शासनाच्या सुचना आल्यास धान्याचे वितरण होऊ शकते.
जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मि.मी. पाऊस पडतो. मात्र गेल्या दोन महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात अति पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मेहकर, देऊळगाव माळी, बिबी, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, शेंदुर्जन, सोनुशी, चांधई या आठ मंडळामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी हालेला शेतमाल हिरावल्या गेला. सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी या पिकांसह भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार या तालुक्यातील २१ गुरांवर अति पावसाने मृत्यूचे संकट ओढावले. तर जिल्ह्यातील ११ घरांची पडझड यामध्ये झालेली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची व्याप्ती बघता कृषी व महसूल विभागाकडून तातडीने सर्वे करण्याला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूनही नुकसानग्रस्त भागातील शेतकºयांसाठी धान्याचे वितरण करण्याचे नियोजन केलेले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दिले जाणारे धान्य शेतकºयांना वेळेवर मिळावे, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. नुकसान झालेल्या भागात धान्याची टंचाई होणार नाही, यासाठी तहसीलस्तरावरून धान्याचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


नुकसानग्रस्त भागातील सर्वांनाच मिळणार का लाभ?
पावसाचा फटका शेतकºयांसोबत शेतमजुरांनाही बसला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार १७ शेतकºयांना गहू २ रुपये किलो व तांदूळ ३ रुपये किलो प्रमाणे वितरीत केल्या जातो. परंतू आता नुकसानग्रस्त भागातील सार्वांनाचा याचा लाभ मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


नुकसानग्रस्त भागामध्ये धान्याचा तुटवडा पडू नाही, यासाठी योग्य ते नियोजन केलेले आहे. सर्वे दरम्यान कुठेही धान्याची आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी तातडीने धान्याची व्यवस्था होईल, याची काळजी घेतली आहे. तहसील स्तरावर आवश्यकतेनुसार धान्याचा साठा ठेवण्यात आलेला आहे.
- गणेश बेल्लाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी बुलडाणा.

 

Web Title: Planning for supply of foodgrains to damaged areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.