संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक
By Admin | Updated: May 19, 2017 00:25 IST2017-05-19T00:25:03+5:302017-05-19T00:25:03+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : चिखली ते टाकरखेड मुसलमान रस्त्यावर गुरुवारी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांना बोलाविले. मात्र, पोलिसांना यायला उशीर झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
चिखली - खामगाव रोडवर टाकरखेड मुसलमान येथील विनोद रामदास गायकवाड (वय ३८) सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. यावर त्याच्या नातेवाईकांनी अमडापूर पो.स्टे.ला माहिती दिली; परंतु पोलीस या अपघात घडलेल्या ठिकाणी आले नाही. त्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांनी बुलडाणा येथील अधिकारी व लोकप्रतिनिधींना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यावर हाकेच्या अंतरावर असलेले अमडापूर पो.स्टे.चे ठाणेदार भूषण गावंडे व त्याचे सहकारी घटनास्थळी पोहचले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर रोष व्यक्त करून दगडफेक केली. यामध्ये ठाणेदार गावंडे यांना किरकोळ इजा झाली. त्यानंतर माजी जि.प. सदस्य श्याम पठाडे, एकनाथ जाधव व संतोष वाकडे यांनी या ठिकाणी आलेल्या मृतकाच्या नातेवाईकांची समजूत घालून मृतक विनोद रामदास गायकवाड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ठाणेदार गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारासुद्धा मृतकाच्या नातेवाईकांनी देऊन अमडापूर पोलिसांचा निषेध केला. या घटनेतील अज्ञात वाहनचालकांविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) १३४, १८३, १८४ मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.
या अपघातातप्रकरणी मृत्यू झालेले विनोद रामदास गायकवाड यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, तीन भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.