चोरून फोटो काढणा-यास बदडले!
By Admin | Updated: November 5, 2015 01:42 IST2015-11-05T01:42:47+5:302015-11-05T01:42:47+5:30
देऊळगाव येथील प्रकार; ४५ वर्षीय व्यक्तीने चोरून काढले फोटो.

चोरून फोटो काढणा-यास बदडले!
देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : आपल्या आईसोबत १६ वर्षीय मुलगी दुकानात किराणा सामान खरेदी करीत असताना ४५ वर्षीय व्यक्तीने चोरून तिचे फोटो काढले. हा प्रकार सदर मुलीच्या लक्षात येताच तिने आईला सांगितल्यानंतर त्या व्यक्तीची मुलीच्या आईने चपलेने चांगलीच धुलाई केली. हा प्रकार समजताच उपस्थित तरुणांनीसुद्धा त्याला बदडून काढले. हा प्रकार शहरातील नगरपालिका वाचनालयाच्या मागे असलेल्या किराणा दुकानासमोर बुधवारी दुपारी घडला. बुधवारी दुपारी एक १६ वर्षीय मुलगी आईसोबत पार्श्वनाथ भवनासमोर असलेल्या किराणा दुकानात सामान खरेदीसाठी आली होती. दुकानाच्या पायर्यावर एका नामांकित कंपनीचे फिल्ड ऑफिसर महाशय उभे होते. आपल्या वयाचे व पदाचे भान न ठेवता त्याने आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवत आपल्याजवळील अँन्ड्रॉइड मोबाइलच्या कॅमेर्याने त्या मुलीचे फोटो काढले. आपल्याला कुणी बघितले नाही, या भ्रमात हे महाशय होते; मात्र त्या मुलीच्या चाणाक्ष नजरेने ही बाब हेरली व लगेच आपल्या आईला सांगितले. आईच्या रागाचा पारा चढताच त्यांनी फिल्ड ऑफिसरच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याला जाब विचारला. हा गोंधळ बघून तेथे काही युवक जमा झाले. त्या युवकांनी त्याच्या मोबाइलची गॅलरी तपासली असता, सदर मुलीचे तीन फोटो आढळून आले. तरुणांनी विकृत मनोवृत्तीच्या महाशयांना चांगलाच प्रसाद दिला. या घटनेनंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे मोबाइलमधील तीन फोटो पोलिसांनी डीलीट करून मेमरी कार्ड ताब्यात घेतले. या प्रकरणात मुलीच्या आईने फिर्याद न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही., मात्र पोलिसांनी संबंधित व्यक्तीला समज दिली.