शेगावचे फहिम देशमुख यांना द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार
By Admin | Updated: September 14, 2014 00:41 IST2014-09-14T00:41:42+5:302014-09-14T00:41:42+5:30
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम पत्रकार पुरस्कारांची घोषणा.

शेगावचे फहिम देशमुख यांना द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार
बुलडाणा: महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम पत्रकार पुरस्कारांची घोषणा झाली असून, राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये शेगाव येथील फहिम आर. देशमुख यांना द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
तंटामुक्त गांव मोहिमेचा प्रचार-प्रसार व्हावा, या अभियानात लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने २00८ पासून, या योजनेच्या प्रसारामध्ये उत्तम भूमिका वठविणार्या पत्रकारांना पुरस्कार देणे सुरू केले. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर हे पुरस्कार देण्यात येतात.
वर्ष २0१२-१३ मध्ये तंटामुक्त गांव मोहिमेसाठी सातत्याने सकारात्मक लिखाण केल्याबद्दल फहिम देशमुख यांना रोख दीड लाख रुपये रकमेचा राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
शेगाव येथे दैनिक लोकमतसाठी वार्तांकनाचे काम करीत असलेल्या देशमुख यांना यापूर्वीही महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पत्रकारिता पुरस्कार, अंधश्रध्दा निर्मुलन समिती पुरस्कार, विकास वार्ता पुरस्कार, उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार मिळाले आहेत.