पेठ येथील पुलाने ओलांडली शंभरी!
By Admin | Updated: October 2, 2016 02:39 IST2016-10-02T02:39:29+5:302016-10-02T02:39:29+5:30
पुल क्षतिग्रस्त झाला असल्यामुळे नवीन पूल बांधण्याची मागणी करण्यात येत आहे.

पेठ येथील पुलाने ओलांडली शंभरी!
चिखली(जि.बुलडाणा), दि. १- तालुक्यातील पेठ येथे पैनगंगा नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाने शंभरी ओलांडलेली असून, सद्यस्थितीत धोकादायक ठरला आहे. या पुलावरील वाहनांची वर्दळ, पुलाची उंची तसेच दरवर्षी पुरामुळे हा पूल पाण्याखाली जात असतानाही अनेक वर्षांपासून त्याचे ऑडिटही झालेले नाही. त्यामुळे या निष्क्रिय पुलाचे तातडीने सर्वेक्षण करून नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा संघटक रवींद्र डाळीमकर यांनी केली आहे.
खामगाव-जालना या राष्ट्रीय महामार्ग क्र.२२८ वरील पेठ येथे पैनगंगा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल निष्क्रिय झालेला असून, सदर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळय़ात नदीतून वाहणार्या पाण्यामुळे वारंवार हा पूल पाण्याखाली जाऊन रस्ता बंद पडतो, याशिवाय या पुलाची रूंदी कमी असून, शंभरी ओलांडलेला हा पूल कधीही कोसळू शकतो, याची दखल घेऊन या पुलाचे सर्वेक्षण करावे व नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी रवींद्र डाळीमकर यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.