बुलडाणा जिल्ह्यातील ६0 रेतीघाटांना परवानगी
By Admin | Updated: January 7, 2016 02:16 IST2016-01-07T02:16:37+5:302016-01-07T02:16:37+5:30
गौण खनिज उत्खननाच्या दुस-या टप्प्यात २४ घाटांच्या लिलावाची शक्यता.

बुलडाणा जिल्ह्यातील ६0 रेतीघाटांना परवानगी
खामगाव: सप्टेंबर २0१५ मध्ये रेतीघाटांची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यातील रेतीघाटांच्या रखडलेल्या लिलाव प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. दरम्यान, पर्यावरण विभागाने जिल्ह्या तील ८६ पैकी ६२ रेतीघाटांच्या लिलावास परवानगी दिली आहे. या रेतीघाटांपैकी ६0 घाटांचाच पहिल्या टप्प्यात जानेवारी महिन्याच्या १0 ते १२ तारखेदरम्यान ऑनलाइन लिलाव होत आहे. दुसरीकडे अवैध गौण खनिज उत्खनन आणि रेती उत्खननप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाने नोव्हेंबर अखेरपर्यंंंत ६१ लाख २४ हजार १0 रुपयांचा दंड वसूल केला आहे. जिल्ह्यातील ८६ रेतीघाटांच्या लिलावासंदर्भात पर्यावरण विभागाकडे गौण खनिज विभागाने ऑक्टोबर-नोव्हेंबर २0१५ दरम्यान परवानगी मागितली होती. त्यानुषंगाने उशिरा का होईना, पर्यावरण विभागाने प्रस्तावित ८६ पैकी ६२ रेतीघाटांतून उपसा करण्यास परवानगी देताना पर्यावरणास त्यामुळे काही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. मुळात डिसेंबर २0१५ मध्येच या रेतीघाटांचा लिलाव अपेक्षित होता; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया आता जानेवारी २0१६ च्या दुसर्या आठवड्यात पूर्णत्वास जात आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात जिल्ह्यातील ६२ रेतीघाटांचा लिलाव होण्याची अपेक्षा होती; मात्र वेळेत पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील महत्त्वपूर्ण बैठकीत त्यासंदर्भात निर्णय न झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. गतवर्षी लिलाव झालेल्या रेतीघाटांतून उपसा करण्याची मुदत ३0 सप्टेंबर २0१५ ला संपुष्टात आली होती. त्यामुळे पूर्णा नदीकाठासह खडकपूर्णा, वानसह जळगाव जामोद तालुक्यातील नद्यांमधून अवैधरीत्या रेतीचे उत्खनन वाढले होते. याबाबत ओरड वाढल्याने गौण खनिज विभागाने तथा महसूल विभागाने जिल्ह्यात कारवाईचे सत्र अवलंबले होते. परिणामी नोव्हेंबर महिन्यात ११२ प्रकरणांमध्ये कारवाई करून १३ लाख ८४ हजार २५0 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. नांदुरा व शेगाव तालुक्यात अनुक्रमे ४६ व १८ प्रकरणांमध्ये कारवाई करीत ६ लाख ६१ हजार ६५0 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.