पंचकोनी लढत
By Admin | Updated: September 28, 2014 00:22 IST2014-09-28T00:22:20+5:302014-09-28T00:22:20+5:30
युती व आघाडी संपुष्टात आल्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघात पंचकोनी लढतीची शक्यता.

पंचकोनी लढत
नानासाहेब कांडलकर /जळगाव जामोद
युती व आघाडी संपुष्टात आल्यामुळे या मतदारसंघात पंचकोनी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. ऐनवेळी युती व आघाडी तुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांना उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागल्याचे आज दिसून आले. त्यामुळे राकाँला उमेदवार आयात करावा लागला, तर शिवसेनेला एका तरुण पदाधिकार्याला उमेदवारी द्यावी लागली. काँग्रेसचा मात्र आज माहोल दिसून आला. या मतदार संघात एकूण २८ उमेदवारांनी ४८ अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार समजल्या जाणारे रमेशचंद्र घोलप यांनी आज शिवसेना व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. त्यामुळे येत्या दोन दिवसात काही राजकीय खलबल होण्याची शक्यता आहे. माजी नगराध्यक्ष डॉ. स्वातीताई वाकेकर यांना काल राकाँचे तिकीट जाहीर झाले असताना त्यांनी अचानकपणे रिंगणात उतरण्यास असर्मथता दर्शविली. त्यामुळे राकाँची उमेदवारी कोणाला, याची उ त्सुकता ताणल्या गेली होती. जि.प.चे माजी उपाध्यक्षद्वय पांडुरंगदादा पाटील व संगीतराव भोंगळ तसेच विश्वनाथ झाडोकार यांच्यापैकी कोणीतरी रिंगणात उतरेल, असा निरीक्षकांचा अंदाज होता; परंतु तसे न घडता भाजपाकडे उमेदवारी मागणारे प्रकाशसेठ ढोकणे यांना पक्षप्रवेश देऊन त्यांना आज राकाँची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ढोकणे यांनी राकाँतर्फे अर्ज दाखल केला. अशीच काही स्थिती सेनेची झाली. सेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने सेनेचे शेगाव शहर प्रमुख संतोष घाटोळ या तरुणाला ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्यासोबत सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी सेना सध्या उमेदवारीबाबत संभ्रमात आहे. कारण प्रथम राकाँशी जवळीक असलेले व नंतर काँग्रेसकडून उमेदवारी मागणारे रमेशचंद्र घोलप यांनी आज अचानकपणे एक अर्ज शिवसेनेकडून, तर एक अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास या मतदारसंघात षटकोनी सामना होऊ शकतो. भाजपाचे उमेदवार आ.डॉ. संजय कुटे यांना सन २00९ च्या निवडणुकीतील आपल्या दोन प्रतिस्पध्र्यांंसोबत पुन्हा सामना करावा लागणार आहे. काँग्रेसचे रामविजय बुरुंगले व भारिप बमसंचे प्रसेनजीत पाटील यांच्याशी यावेळीही टक्कर आहे. मनसेचे उमेदवार गजानन वाघ यांचेही मोठे आव्हान डॉ. संजय कुटे यांना पेलावे लागणार आहे. सध्या चित्र अस्पष्ट असले तरी २00९ च्या निवडणुकीतील तीन प्रतिस्पध्र्यांंमध्ये राकाँ, सेना व मनसे या तीन नवीन उमेदवारांची भर पडल्याने कोण कोणाला घातक ठरणार, हे काही दिवसात स्पष्ट होईल.