शाळेतील समस्या सोडविण्यासाठी पदयात्रा
By Admin | Updated: March 5, 2016 02:33 IST2016-03-05T02:33:50+5:302016-03-05T02:33:50+5:30
२७ किमीचा प्रवास; शेकडो ग्रामस्थांचा सहभाग.

शाळेतील समस्या सोडविण्यासाठी पदयात्रा
बुलडाणा : तालुक्यातील धाड येथील उर्दू शाळेच्या विविध समस्यांबाबत आजपर्यंत बर्याच वेळा आंदोलने करण्यात आली; परंतु अद्यापही समस्या सोडविण्यात आल्या नाहीत. विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळेतील समस्यांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, या मागणीसाठी ४ मार्च रोजी धाड सरपंच रिजवान सौदागर यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्यावतीने धाड ते बुलडाणा अशी २७ कि.मीची पदयात्ना काढण्यात आली.
धाड येथील उर्दू शाळेला विविध समस्यांचे ग्रहण लागले आहे. शाळेत विद्यार्थ्यांंंसाठी पाण्याची सुविधा नसून, संगणक वर्गदेखील सुरू करण्यात आला नाही, त्यामुळे या शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारी रोजी धाडचे सरपंच रिजवान सौदागर व ग्रामपंचायत सदस्य मो.शफी यांनी मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले होते. तरीही जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली नाही.
यामुळे संतप्त ग्रामस्थांनी व्यवस्थापन वेगळे करून अतिरिक्त तुकडीवर शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, पिण्याच्या पाण्यासह शाळेत संगणक वर्ग सुरू करण्यात यावे, क्रीडा शिक्षकासह साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी आज ४ मार्च रोजी धाड ते बुलडाणा अशी २७ किमीचा पदयात्रा मोर्चा काढला. यात गावातील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मोर्चा धाडपासून ८ किमी अंतरावर दुधा घाटात आल्यानंतर मोर्चाला थांबविण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वैशाली ठग तेथे पोहोचल्या; मात्र आंदोलनकर्त्यांंंना समाधानकारक उत्तर न दिल्या गेल्यामुळे पदयात्रा पुढे जाऊ लागली. या पदयात्रा मोर्चात ग्रा.पं. सदस्य मो.शफी, खालिद खान, हाजी नईम खान, वाजीद खान, मो. मुश्ताक सौदागर, शेख जुबेर, शेख कासीम यांच्यासह शेकडो युवक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.