खासगी रुग्णालयातील रुग्णांची देयके तपासणीशिवाय घेऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST2021-05-10T04:35:18+5:302021-05-10T04:35:18+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात ९ मे रोजी झालेल्या कोविड संसर्ग नियंत्रण बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. या ...

खासगी रुग्णालयातील रुग्णांची देयके तपासणीशिवाय घेऊ नये
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात ९ मे रोजी झालेल्या कोविड संसर्ग नियंत्रण बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. या बैठकीस खा. प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, आ. डॉ. संजय कुटे, आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी खामगाव येथील कोविड निदान प्रयोगशाळा तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील चाचण्यांचे अहवाल लवकर प्राप्त होतील आणि बाधित रुग्णांना उपचार मिळतील. तसेच ज्या खासगी व शासकीय रुग्णालयांचे फायर व ऑक्सिजन ऑडिट राहिले आहे त्यांनी ते त्वरित पूर्ण करावे, असे स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आहेत. त्या ठिकाणी सिटी स्कॅन स्कोर बघून उपचार दिले जातात. त्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्या जात नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी दिसून येते. परिणामी जिल्ह्याला रेमडेसिविर व ऑक्सिजन पुरवठा जिल्ह्याला कमी होतो. त्यामुळे खासगी रुग्णालयामधील रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. सोबतच कोविड उपचार सुरू असलेल्या रुग्णांचीही बाधित म्हणून नोंद करावी. बेडची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाने ॲपची तांत्रिकता तपासून ते लाँच करावे, असे सांगितले. सोबतच दुसऱ्या डोसचा ड्यू असलेल्यांना प्रथम डोस द्यावा. त्यानंतर पहिल्या डोसला सुरुवात करावी, असे ते म्हणाले. लसीकरण गतिमान होईल यादृष्टीने यंत्रणांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. बैठकीस तहसीलदारांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.