बँड पथकाचा सरावही बंद
बुलडाणा : सध्या लग्नसराईस सुरुवात झाली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे बँड पथकाला बोलावण्यात येत नाही. त्यामुळे यंदा बँड पथकाचा सरावही बंद असल्याचे दिसून येत आहे.
गावरान आंब्यांचा मोहोर गळाला
बुलडाणा : या वर्षी चांगला पावसाळा झाल्याने गावरान आंब्याच्या झाडांना मोहोर आला होता. परिसरातील शेतामध्ये गावरान आंब्याची मोठी झाडे आहेत. काही ठिकाणी झाडांची सलग आमराई आहे. परंतु अवकाळी पावसाने गावरान आंब्याचा मोहोर गळाल्याचे दिसून येते.
कोरोनामुळे बाजार स्थगित
बुलडाणा : कोरोनाचा वाढता धोका पाहता खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील रविवारचे आठवडी बाजार स्थगित करण्यात आले होते. रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात अनेक खेड्यांतून नागरिक येतात. बाहेरगावातील व्यापारी आपली दुकाने लावतात. संभाव्य धोका पाहता आठवडी बाजार स्थगित करण्यात आला होता.
अधिक रकमेच्या कर्जमंजुरीसाठी निर्बंध
बुलडाणा : बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांना ५ लाखांपर्यंत सर्व प्रकारचे पीक व महामंडळाचे कर्ज मंजूर करण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी अनेक वेळा करण्यात आलेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना मुख्य कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाची रक्कम कमी दाखवून शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यात येते.
उन्हाळी हायब्रिडचे नुकसान
बुलडाणा : धाड शिवारात उन्हाळी हायब्रिड बहरले होते. या वर्षी परिसरात मुबलक जलसाठा असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय आहे. त्यामुळे उन्हाळी हायब्रिड लागवड वाढली, परंतु अवकाळी पावसाने या उन्हाळी हायब्रिड पिकाचे नुकसान झाले आहे.