शिक्षकांना लोकवर्गणी देण्यास पालकांचा नकार!
By Admin | Updated: April 18, 2017 00:08 IST2017-04-18T00:08:38+5:302017-04-18T00:08:38+5:30
चार संगणक संच, प्रोजेक्टर बंद असताना पुन्हा खटाटोप

शिक्षकांना लोकवर्गणी देण्यास पालकांचा नकार!
सोनाळा : येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील चार संगणक संच व एक प्रोजेक्टर बंद अवस्थेत ठेवून पालकांसमोर ई-लर्निंगकरिता पुन्हा लोकवर्गणी मागायला सुरुवात केली. मात्र, मागील अनुभव पाहता पालक शिक्षकांना थेट नकार देत असून, त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांवर पश्चात्तापाची पाळी आली आहे.
येथील पोस्ट आॅफीसजवळ जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा आहे. शाळेत १ ते ७ वर्ग आहेत. यामध्ये १४ शिक्षक ४२४ विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत. विद्यार्थ्यांकरिता जिल्हा परिषद कोट्यामधून २०१० मध्ये पाच संगणक संच मिळाले होते. पण, ते शाळेतून गायब झाले होते. २०१४ मध्ये १५ हजार रुपयांची लोकवर्गणी शिक्षकांनी गोळा करून पुन्हा डिजिटल रूम तयार केली. पण, या डिजिटल रूममध्ये आजतागायत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी पाऊल ठेवले नसल्याचे बोलल्या जात आहे. २०१५ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एक प्रोजेक्टर व एक लॅपटॉपही शाळेला दिले आहे. पण, हे प्रोजेक्टर व लॅपटॉप एका शिक्षकाने घरी नेवून त्याचा उपयोग करीत असल्याचे समोर आले आहे. शाळेत चार संगणक संच, एक डिजिटल प्रोजेक्टर व लॅपटॉप असतानाही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सदर बाब माहिती पडल्याने काही पालक शिक्षकांना वर्गणी देताना अनेक प्रश्नांचा भडीमार करताना दिसतात, तर काही पालक शिक्षकांना लोकवर्गणीकरिता थेट नकार देत आहेत. यामुळे पालकांच्या दारावरून शिक्षकांना लोकवर्गणीविना परतावे लागत आहे व त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ आली आहे.
लोकवर्गणीतून टीव्ही स्क्रीन
मुख्याध्यापक व शिक्षकांनी ई-लर्निंगकरिता टी.व्ही. स्क्रीनचा नवा फंडा लोकवर्गणीचा वापरल्यामुळे वर्गणीदारच पेचात सापडले आहेत. लोकवर्गणीतून आणलेल्या टी.व्ही. स्क्रीनची अवस्थासुद्धा शाळेत असलेल्या संगणक संच, प्रोजेक्टर व लॅपटॉपप्रमाणे, तर होणार नाही ना, अशी शंका पालकांना येत आहे.