‘परमवीर चक्र’ विजेते तीन शूरवीर एकाच व्यासपीठावर
By Admin | Updated: July 13, 2015 01:12 IST2015-07-13T01:12:15+5:302015-07-13T01:12:15+5:30
गुरुवारी सत्कार; बुलडाणेकर होणार ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार.

‘परमवीर चक्र’ विजेते तीन शूरवीर एकाच व्यासपीठावर
बुलडाणा : देशाच्या रक्षणासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता तिरंग्याची शान राखण्यासाठी दुश्मनाशी दोन हात करून युद्ध जिंकणार्या जवानांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार ह्यपरमवीर चक्रह्ण प्रदान करून सन्मानित करण्यात येते. अशा परमवीर चक्राने सन्मानित तीन योद्धय़ांचा बुलडाण्यातील सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तिन्ही वीर देशात प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार असून, आपले अनुभव कथन करणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर मिलिंदकुमार बडगे यांनी दिली. बुलडाणा बसस्थानकासमोरील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १२ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष टी.डी. अंभोरे पाटील, कमांडर अशोक राऊत, जिल्हा होमगार्ड निदेशक दीपक पाटील, शौर्यपदक प्राप्त रमेश बाहेकर उपस्थित होते. कमांडर बडगे पुढे म्हणाले की, परमवीर चक्र सन्मान मरणोत्तर देण्यात येत असतो; मात्र देशाच्या ३ सुपुत्रांना आपल्या शौर्याबद्दल जिवंतपणी हा सन्मान मिळाला आहे. त्यात ऑनररी कॅप्टन बाणासिंह रा. जम्मू काश्मीर, सुभेदार योगेंद्रसिंह यादव रा. उत्तरप्रदेश, तसेच नायब सुभेदार संजयकुमार रा. हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. सदर तिन्ही शूरवीर आतापर्यंंंत एकत्र आले नाहीत; मात्र बुलडाण्यातील सत्कार कार्यक्रमात तिन्ही शूरवीर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. बुलडाण्यात गुरुवारी तिन्ही शूरवीर दाखल होताच सर्वप्रथम हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. त्यानंतर शहरातील जयस्तंभ चौकात बुलडाणा नगरपालिकेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर सहकार विद्या मंदिराच्या सभागृहापर्यंंंत खुल्या जीपमधून तिघांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशाच्या तीन शूरवीरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी सैनिक कल्याण अधिकारी कमांडर बडगे यांनी केले. यावेळी तिन्ही शूरवीर आपले युद्धातील पराक्रमाविषयी अनुभव कथन करणार आहेत. कर्नल सुहास जतकर यांच्या प्रयत्नातून हा सोहळा बुलडाण्यात प्रथमच होत असल्याचे त्यांनी सांगितले.