अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने प्रस्थापितास पाजले पाणी
By Admin | Updated: August 7, 2015 01:06 IST2015-08-07T01:06:09+5:302015-08-07T01:06:09+5:30
शिल्पाला मिळाली ८९ मते; सरपंचपद भोगलेले दादाराव आटोळे यांचा पराभव.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने प्रस्थापितास पाजले पाणी
जयदेव वानखडे / जळगाव जामोद (जि. बुलडाणा) तालुक्यात कुरणगाड बु. या ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या कु.शिल्पा श्रीराम उमाळे या तरुणीने बाजी मारली. तिने तब्बल पाचवेळा त्याच ग्रामपंचायतचे सरपंचपद भोगलेले दादाराव आटोळे यांचा पराभव केला. ७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रा.पं.ची निवडणूक लागल्यानंतर येथील ६ सदस्य बिनविरोध झाले. मात्र केवळ एका जागेसाठी अविरोध होण्याचा बहुमान मिळवू शकले नाही. अखेर या एका जागेसाठी येथे निवडणूक रंगली एकाबाजूला माजी सरपंच दादाराव आटोळे पाटील तर दुसऱ्या बाजूला महाविद्यालयीन विद्यार्थिनी. मात्र मतदारांनी शिल्पाच्या पारड्यात मताचे दान करुन तिला विजयी केले. शिल्पाला ८९ मते मिळाली. या वार्डात १६६ मतदारांनी मतदान केले. दादाराव पाटील यांना ७३ मते मिळाली. शिक्षण घेता-घेता राजकारणही कळावे यासाठी शिल्पा स्वईच्छेने ग्रा.पं. राजकारणात उतरली आणि नामाप्र राखीव मतदार संघातून तिने निवडणूक लढविली. विशेष म्हणजे या वार्डातील सर्व मतदार हे अनु.जाती मधून होते. यामध्ये शिल्पा ही विद्यार्थीनी विजयी झाली.