जिगाव धरणावर पलसोडा ग्रामस्थांचे उपोषण
By Admin | Updated: April 22, 2016 02:23 IST2016-04-22T02:23:09+5:302016-04-22T02:23:09+5:30
पुन्हा काम बंद; पुनर्वसन, नवीन भूसंपादन कायद्यानुसार हवा मोबदला.

जिगाव धरणावर पलसोडा ग्रामस्थांचे उपोषण
सुहास वाघमारे / नांदुरा (जि. बुलडाणा)
मागील तीन दशकांपासून रखडलेला व यावर्षी चार वेळा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे काम बंद पडलेल्या जिगाव प्रकल्पाच्या मातीभिंतीवर नांदुरा तालुक्यातील पलसोडा येथील सुमारे पन्नास प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांसाठी २१ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरु केल्याने शेकडो वाहने, सातशे मजूर, यंत्रसामग्री अशी मोठी यंत्रणा ठप्प पडून आहे. त्यामुळे जिगाव प्रकल्पाचे काम बंद व प्रकल्पग्रस्तांची आंदोलने सुरु, असे चित्र प्रकल्पस्थळी आहे.
आठ दिवसांपूर्वी आडोळ येथील प्रकल्पग्रस्तांनी जिगाव प्रकल्पाच्या गेटच्या पायाचे काम बंद पाडून आंदोलन केले. त्यानंतर जिगाव येथील प्रकल्पग्रस्तांनी २0 एप्रिल रोजी काम बंद पाडले व आता २१ एप्रिलच्या सकाळी पलसोडा येथील प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांसाठी पाया बांधकामाजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे. पलसोडा येथील गजानन चांभारे, दिलीप पाटील, संजय चांभारे, गजानन धुळे, भानुदास इंगळे, रामेश्वर सुरळकार, सुधाकर सुरळकार, भगवान सुरळकार, सुधाकर गोरे, रघुनाथ तायडे, पुरुषोत्तम खुंडकर, सुलभा धुळे, सुभद्रा सुरळकार, सुमन सुरळकार, शेवंता कांडेलकर, बेबा झालटे, शोभा वावरे, देवका धुळे, गुंफा धुळे, यमुना सुरळकार यांच्यासह सुमारे पन्नास प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. पलसोडा येथील अतिक्रमकांची प्रत्यक्ष पाहणी करून संयुक्त मोजणी करावी. महिनाभरात मोजणी करून नवीन भूसंपादन कायद्यानुसार कलम अकरा लावण्यात यावी. अतिक्रमकांना नवीन गावठाणात पुनर्वसनांतर्गत प्लॉट देण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा प्रारंभ पलसोडा येथील प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्यांच्या या आमरण उपोषणामुळे प्रकल्पाचे पाया बांधकाम बंद पडले आहे.