पलढग निसर्ग पर्यटन, देव्हारी पुनर्वसनाचा मुद्दा वनमंत्र्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST2021-01-17T04:29:41+5:302021-01-17T04:29:41+5:30

बुलडाणा मतदारसंघातील पलढग धरणावर निसर्ग पर्यटन विकास आराखड्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून गाजत आहे. या ठिकाणी पर्यटनाचा विकास व्हावा, या ...

Paldhag Nature Tourism, Devhari Rehabilitation issue in the Forest Minister's Chamber | पलढग निसर्ग पर्यटन, देव्हारी पुनर्वसनाचा मुद्दा वनमंत्र्यांच्या दालनात

पलढग निसर्ग पर्यटन, देव्हारी पुनर्वसनाचा मुद्दा वनमंत्र्यांच्या दालनात

बुलडाणा मतदारसंघातील पलढग धरणावर निसर्ग पर्यटन विकास आराखड्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून गाजत आहे. या ठिकाणी पर्यटनाचा विकास व्हावा, या उद्देशाने धरणात बोट, लहान मुलांसाठी उद्यानासह खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार गायकवाड यांनी केली होती. त्यासंदर्भात वारंवार मागणी करून बैठकीची मागणी आ. गायकवाड यांनी केली होती. या मागणीवरून वनमंत्र्यांच्या दालनात मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत या विषयासह मतदारसंघातील बोरखेड, मोताळा, मोहेगाव, खैरखेड येथील रस्त्यांच्या विषयावरदेखील चर्चा होणार आहे. बोरखेड, पलढग, तारापूर, कोमलवाडी, तरोडा या मार्गावर एसटी बस सुरू होती. मात्र, हा रस्ता खराब झाल्याने या परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बोरखेड येथील नागरिकांना मोताळा अथवा तरोडा येथे जायचे असल्यास बुलडाणा, राजूर मार्ग अशा १० कि.मी.चा फेरा देऊन जावे लागत आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारित असल्याने हा विषय प्रलंबित होता. या विषयावर चर्चा होणार असल्याने आता हा विषय मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

देव्हारी पुनर्वसनाकडे लक्ष

बुलडाण्यातील देव्हारी गाव हे वनविभागाच्या अखत्यारित असल्याने या गावाच्या विकासासंदर्भात अनेक अडचणी येत होत्या. गावात मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या, म्हणून या गावातील नागरिकांनी गावाच्या विकासासंदर्भात गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. गाव पुनर्वसनासाठी निधीची कमतरता असल्याने हा विषय मागे पडला होता. बैठकीत हा विषयदेखील महत्त्वाचा असून, त्यावर चर्चा होणार आहे.

Web Title: Paldhag Nature Tourism, Devhari Rehabilitation issue in the Forest Minister's Chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.