अमडापूर येथील चावडी गेली चोरीला!
By Admin | Updated: May 28, 2016 01:44 IST2016-05-28T01:44:06+5:302016-05-28T01:44:06+5:30
शोध घेण्याची प्रशासनाकडे मागणी; ३ लाख ८३ हजारांची बांधली होती इमारत.

अमडापूर येथील चावडी गेली चोरीला!
बुलडाणा : शासकीय अधिकारी, मामलेदार यांच्या सोयी बरोबरच गावाचा कारभार पाहण्यासाठी प्रत्येक गावाला पूर्वी चावडी असायची, आजही गावागावांत ही चावडी कायम आहे. मात्र अमडापूर येथील ही चावडीच चोरीला गेल्याची खळबळजनक माहिती येथील विजय उकर्डा भालेराव यांनी बाहेर काढली असून, ही चावडी शोधून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. इतर गावाप्रमाणेच अमडापूर येथेसुद्धा ग्रामपंचायतीला चावडी होती. मात्र ही चावडी कोठे आहे, हे गावाकर्यांना माहीत नाही. विशेष म्हणजे सन २00३-0४ या वर्षात अमडापूर येथील चावडीवर ३ लाख ८३ हजार रुपये शासनाने खर्च केल्याची बाब समोर आल्यानंतर येथील विजय उकर्डा भालेराव यांनी चावडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना गावात कोठेच चावडी दिसली नाही. अखेर त्यांनी माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायतीला चावडीबद्दल माहिती मागितली. मात्र ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर सुद्धा चावडी आढळून आली नाही. दुसरीकडे मात्र शासनाच्या १९६२ हस्तांतरित टिपणीनुसार स्थानिक ग्रामपंचायतीच्या ताब्यात चावडी देण्यात आल्याची नोंद आहे. जर १९६२ च्या रेकॉर्डवर चावडी आहे, तर ग्रामपंचायतीच्या सातबार्यावर चावडीचा उल्लेख का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. विजय भालेराव यांनी मागितलेल्या माहितीनुसार त्यांना ग्रामपंचायतीने स्वत:च्या मालकीच्या एकूण २९ मालमत्तेची माहिती दिली. यामध्ये शॉपिंग सेंटर, दुकान गाळे, सभागृह, ग्रामपंचायत कार्यालयाचा उल्लेख आहे, मात्र चावडीचा कोणत्याच सातबार्यामध्ये उल्लेख नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची चावडी शोधून द्यावी, अशी मागणी भालेराव यांनी केली आहे.