डेंग्यूसदृश आजाराचा उद्रेक
By Admin | Updated: November 8, 2014 23:49 IST2014-11-08T23:49:20+5:302014-11-08T23:49:20+5:30
आरोग्य विभाग अनभिज्ञ; खेर्डा येथे१२ जणांना लागण तर सिंदखेडराजा तालुक्यातील पाच जण डेंगू सदृश तापाने दगावले.

डेंग्यूसदृश आजाराचा उद्रेक
जळगाव जामोद (बुलडाणा) : तालुक्यातील ग्राम खेर्डा बु. आणि खेर्डा खुर्द या दोन्ही गावात डेंग्युच्या आजाराची लागण झाली असून, गेल्या १0 ते १५ दिवसांपासून आजारी रुग्ण जळगाव, अकोला आणि खामगाव येथे खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत; मात्र याबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ असून, गावात अद्याप कुठलेही पथक अथवा मोठय़ा डॉक्टरांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे गावकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन्ही गावातील १0 ते १२ रूग्ण सध्या डेंग्यूने ग्रस्त आहेत.
डेंग्यूची लागण झालेल्या रूग्णांमध्ये खेर्डा बु. या गावातील जान्हवी प्रमोद भोपळे (वय ७), श्रीजय मधुकर भोपळे (वय ११), परमेश्वर सुरेश बंबटकार (वय १५), कपील देवानंद तायडे (वय ९), शुभांगी सारंगधर बोचरे (वय २0) वर्षे या रूग्णांचा तर खेर्डा खुर्द या गावामधील अश्विनी प्रभाकर भिसे (वय ११), गजानन दत्तात्रय म्हसाळ (वय ३0), गोपाळ जगदेव वानखडे (वय २७), गणेश हरिदास खिरोडकर (वय ७) इत्यादी रूग्णांचा समावेश आहे. तर याशिवायसुद्धा डेंग्युचा आजार झालेले रूग्ण गावात आहेत. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून, गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा याबाबत संबंधित विभागाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. यापैकी बहुतांश रूग्ण हे अकोला येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.
*डेंग्यूने सात वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
सिंदखेडराजा शहरातील एका सात वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली. येथील नसिमखान दुराणी यांच्या महेक या सात वर्षीय चिमुकलीला ताप येत असल्याकारणाने तिला उपचारार्थ औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल एक महिन्यापासून महेक हिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च करूनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही; दरम्यान महेक हिचा डेंग्यू तापामुळे शुक्रवारला मृत्यू झाला. यापूर्वीसुद्धा शहरातील चार जणांचा डेंग्यूसदृश तापामुळे मृत्यू झाला. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.