इतर परीक्षा होऊ शकतात, मग एमपीएससी का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST2021-03-13T05:03:17+5:302021-03-13T05:03:17+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ मार्च रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण समोर करत वर्ग ...

इतर परीक्षा होऊ शकतात, मग एमपीएससी का नाही?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ मार्च रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण समोर करत वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ गटातील अधिकारीपदासाठी १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यात २०० जागांसाठी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी २ लाख ६३ हजार उमेदवार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, परीक्षेला अवघे तीन दिवस उरले असताना परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यापूर्वी एमपीएससीची परीक्षा फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आली होती.
आता २१ मार्चला होणार परीक्षा
गेल्या वर्षभरात चौथ्यांदा परीक्षा रद्द झाली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये शेवटची परीक्षा झाली होती. त्यानंतर २०२० ची परीक्षा जाहीर झाली, ती आजवर होऊ शकलेली नाही. एप्रिल २०२० ची परीक्षा कोरोनामुळे रद्द झाली. सप्टेंबर २०२० मध्येही झाली नाही, ऑक्टोबर २०२० मध्ये दोनदा परीक्षा जाहीर झाल्या व पुन्हा रद्दही झाल्या, आता मार्चमध्ये नक्की होणार, याची आशा असताना पुन्हा रद्द झाली. आता २१ मार्चला ही परीक्षा होणार आहे.
परीक्षेसाठी हॉलतिकीटही दिले गेले होते
परीक्षेची संपूर्ण तयारी झालेली असताना आणि परीक्षेसाठी हॉलतिकीटही मिळालेले असताना ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यापूर्वीही अशाचप्रकारे परीक्षा एक दोन दिवसांवर असताना पुढे ढकलली होती. अशा प्रकारांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन त्यांचा वारंवार हिरमोड होत आहे.
इतर परीक्षा होतात, मग एमपीएससीवरच गंडांतर का ?
१ महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. केंद्र सरकारच्या परीक्षाही होत आहेत. मग एमपीएससी परीक्षार्थिंवरच अन्याय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, विद्यार्थ्यांना पीपीई कीटचे संरक्षण देऊन तसेच विद्यार्थ्यांची वयोमर्यादेच्या अटीत ३ वर्षांची वाढ करून देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
३ गेल्या दोन वर्षांत युपीएससीची उपपरीक्षा प्रक्रिया होऊन दुसरी पूर्वपरीक्षाही झाली. जेईई, नीट, वेगवेगळ्या सीईटीही झाल्या. मग एमपीएससीचीच परीक्षेवर गंडांतर का येते, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.
युपीएससी देशभरात परीक्षा घेत असतानाही दोन परीक्षा झाल्या. त्याचप्रमाणे जेईई, नीटसारख्याही परीक्षा कोविडमध्येच झाल्या. असे असताना केवळ एमपीएससीच वारंवार पुढे का ढकलली जात आहे.
- वैभव शेळके, परीक्षार्थी
परीक्षा होणे आवश्यक होते. युपीएससीने कोरोनाचा प्रभाव असताना परीक्षा घेतल्या. मग एमपीएससीलाच काय अडचण आहे. असा प्रश्न परीक्षार्थिंना पडला आहे. परीक्षेची संपूर्ण तयारी केली होती.
- श्याम येनकर, परीक्षार्थी.
परीक्षा पुढे ढकलल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाकाळात अन्य परीक्षा होत असतील तर एमपीएससीची परीक्षा का होत नाही? हा अनाकलनीय प्रश्न आहे.
- योगेश पोटे, परीक्षार्थी.