खुल्या बाजारात कापसाला ५७०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:51 IST2021-01-16T12:51:02+5:302021-01-16T12:51:16+5:30
Cotton News कापसाचा दर ५७०० रुपये क्विंटलच्या घरात पोहोचला आहे.

खुल्या बाजारात कापसाला ५७०० रुपये भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : प्रारंभी खुल्या बाजारात कापसाचे दर ५४०० ते ५५०० रुपये क्विंटलच्या घरात होते. आता कापसाचा दर ५७०० रुपये क्विंटलच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे शासकीय केंद्रांकडे विक्रेत्यांनी पाठ फिरविली आहे.
शासकीय हमी केंद्रांमध्ये कापूस विक्रीसाठी येणा-या शेतक-यांचा कल वाढला होता. मात्र, आता कापसाला ५६०० ते ५७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. खुल्या बाजारात कापसाचा दर ५७०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे शेतकरी आता खुल्या बाजाराकडे वळले आहेत. दरवर्षी १५ जानेवारीनंतर कापसाच्या दरात घसरण होते. यावर्षी मात्र उलटे चित्र आहे. १५ जानेवारीनंतर कापूस घसरेल आणि वाढत्या उन्हाचाही वजनावर परिणाम होईल, यामुळे शेतक-यांनी १५ जानेवारीपूर्वीच मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री केली. त्यातच, गुलाबी बोंडअळी आल्याने कापसाची उलंगवाडी लवकर झाली. खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव, घाटपुरी, पळशी बु. या भागातील शेतक-यांच्या कापसाच्या उत्पादनात ५० टक्के घट आली आहे. जिल्ह्यातही बहुतांश भागातील शेतक-यांना बोंडअळीमुळे ५० टक्केच उत्पादन झाले आहे. यामुळे शेतक-यांच्या घरात आता मोजकाच कापूस शिल्लक राहिला आहे.
कृषी अधिका-यांनी फरदडीचा कापूस घेऊ नये, असे आवाहन केले आहे. फरदडीचा कापूस घेतला तर बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील वर्षीही कायम राहील तसेच आणखी वाढ होईल, असा इशारा कृषी विभागाने दिल्यामुळे अनेक शेतक-यांनी फरदडीचा कापूस घेतला नाही. त्यामुळेही कापसाच्या आवकमध्ये घट झाली आहे.
वाढलेल्या दराचा फायदा व्यापाऱ्यांनाच
सीसीआयने कापसाची खरेदी सुरू केली. मात्र, बोंडसड व बोंडअळीने कापसाची प्रत घसरल्यामुळे कापसाला भाव कमी मिळाला. त्यामुळे शेतक-यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री केली. व्यापाऱ्यांनी सुरुवातीला कापूस निघाल्यावर कमी भावात खरेदी केला.
व्यापा-यांनी गावातून ५३०० रुपयांपासून कापसाची खरेदी केली आहे. आता कापसाला ५६०० ते ५७०० रुपये भाव मिळत आहे. आता क्विंटलमागे ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे वाढलेल्या दराचा फायदा खरेदी करणा-या व्यापा-यांनाच होणार आहे.
बोंडअळीच्या कारणाने हमी केंद्रावर दर मिळेना
हमी दर ५७२५ रुपये क्विंटल आहे. लांब धाग्याच्या कापसालाच चांगला दर आहे. गुलाबी बोंडअळीने कापूस डॅमेज झाला. आता याच कारणाने हमी केंद्रावर ५६०० दरापर्यंत कापसाची खरेदी होत आहे. खुल्या बाजारात त्यापेक्षा १०० रुपये अधिक दर मिळत आहे. शिवाय, नगदी पैसे मिळणार आहेत. यामुळे खुल्या बाजाराकडे शेतक-यांचा कल सोमवारपासून वाढण्याची शक्यता आहे.