रब्बीची केवळ तीन टक्के पेरणी
By Admin | Updated: October 16, 2015 01:57 IST2015-10-16T01:57:47+5:302015-10-16T01:57:47+5:30
अल्पपावसाचा फटका ; १ लाख ५२ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन.

रब्बीची केवळ तीन टक्के पेरणी
बुलडाणा : यंदा पावसाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम शेतकर्यांच्या हातातून गेला. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे बर्याच शेतकर्यांनी पिकांवर नांगर फिरविला. यामुळे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकर्यांची रब्बी हंगामाकडून आशा वाढली आहे; मात्र रब्बी हंगाम सुरू होऊन एक महिना लोटला तरी जिल्ह्यात सात तालुक्यात केवळ चार हजार हेक्टरवर तीन टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ७.४८ लाख हेक्टर आहे. यात १.५२ लाख हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे नियोजन कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने केले आहे. यंदा ९८ टक्के खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे; मात्र यंदा जिल्ह्यात पाण्याची कमतरता लक्षात घेता, गहू आणि मका या पिकांपेक्षा कमी पाण्यात येणार्या हरभरा पिकाची पेरावाढ होण्याची शक्यता आहे. यंदा सुरुवातीला अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, तर वेळेवर पाऊस न आल्यामुळे खरिपातील पिके शेतकर्यांच्या हातातून गेली. बर्याच तालुक्यात शेतकर्यांनी सुकलेल्या पिकांवर नांगर फिरविला, शिवाय आपले गुरे पिकांमध्ये सोडली. यामुळे खरिपाची पेरणी न झालेले आणि पीकबाधित झालेले असे एकूण ३६ हजार हेक्टर खरीप पेरणीक्षेत्र रब्बीकडे वळविण्यात आले. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघेल, या आशेवर शेतकरी रब्बीची पेरणी करीत आहे.