पाच वर्षात केवळ १८ हजार अपंगांनाच सवलतीचा लाभ
By Admin | Updated: December 3, 2014 00:44 IST2014-12-03T00:44:59+5:302014-12-03T00:44:59+5:30
आज जागतिक अपंग दिन : बुलडाणा जिल्ह्यात अपंगांच्या नशिबी सावत्रपणाची वागणूक.

पाच वर्षात केवळ १८ हजार अपंगांनाच सवलतीचा लाभ
बुलडाणा : अपंगत्वाचं जीणं जगणार्यांना समाजाच्या सहानुभूतीपेक्षाही हक्काचं विश्वासाचं पाठबळ हवं असतं. त्यांचे हक्क, अधिकार आणि सेवा-सुविधा याबाबत शासनस्तरावर जाणीवपूर्वक प्रयत्न होत असले तरी या प्रयत्नांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. विविध शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, बँका येथे नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. आता प्रशासनाच्यावतीनेही अपंगांना अशीच वागणूक मिळत आहे. त्यामुळेच पाच वर्षात केवळ १८ हजार अपंगांनाच शासकीय सवलतीचा लाभ मिळू शकला आहे.
जिल्ह्यात गत ५ वर्षात नोंदविण्यात आलेली अपंगाची संख्या १ लाख १८ हजार ७२३ आहे; मात्र आजपर्यंत केवळ १८ हजार ९३४ अपंगालाच विविध शासकीय सवलतींचा लाभ मिळत आहे. २0१३ मध्ये ११९१ अपंग व्यक्ती तर २0१४ मध्ये १७0७ अपंग विविध सवलतीसाठी प्राप्त ठरले. अपंगांचे खोट प्रमाणपत्र सादर करून शासकीय सवलती लाटणार्यांची संख्या मोठी आहे; मात्र खरे अपंग मात्र अद्याही या अपंगाना शासकीय योजना व सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अपंग पुनर्वसन केंद्रात चालविले जाते. प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि तिसर्या बुधवारी अपंग बोर्डाच्यावतीने येथे अपंगाची तपासणी करून त्यांना अपंग असल्याचे निश्चित करून त्यांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात येते. येथून मिळणार्या अपंग प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना विविध योजनेचा लाभ मिळविता येते. अपंगाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सकाळपासून जिल्हाभरातून आलेल्या लोकांची अपंग पुनर्वसन केंद्राच्या परिसरात गर्दी असते.