पहिली ते पाचवीला एकच शिक्षक !

By Admin | Updated: August 3, 2015 01:23 IST2015-08-03T01:23:10+5:302015-08-03T01:23:10+5:30

संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची स्थिती.

One teacher from the first to the fifth! | पहिली ते पाचवीला एकच शिक्षक !

पहिली ते पाचवीला एकच शिक्षक !

युसुफ शेख / संग्रामपूर (जि. बुलडाणा): सारे शिकुया पुढे जाऊ या या वाक्यातून शासन शिक्षणाचे महत्व पटवून देत आहे. शाळबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी केल्या जात असतानाच, शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील वरवट खंडेराव येथील शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंंत एकच शिक्षक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संग्रामपूर प.स.अंतर्गत वरवट खंडेराव येथील जि.प.उर्दू प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ५ अशा ५ इयत्ता आहेत. परंतु या ५ इयत्तेमधील विद्यार्थ्यांंना शिकविण्यासाठी फक्त एकच शिक्षक आहे. या ५ वर्गांंना कसे शिक्षण द्यावे हा प्रश्न आता या शिक्षकाला पडला आहे. ही २0१३-१४ या सत्रापासून कायम असून शाळेत कार्यरत शिक्षकाला विद्यादानासोबतच इतर प्रशासकीय जबाबदार्‍याही पार पाडाव्या लागतात. त्यामुळे वरवट खंडेराव येथील विद्यार्थ्यांंचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या दोन वर्षांंपासून शेख अहेमद हेच शाळेतील विविध जबाबदार्‍या पार पाडत आहेत. दरम्यान, या एकमेव शिक्षकांची ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ड्युटी लागल्यामुळे या शाळेतील विद्यार्थी वार्‍यावर आहेत. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांंंना गावातील सुज्ञ नागरिक अथवा खिचडी शिजविणारे व्यक्ती मार्गदर्शन करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिक्षण समि तीने बरेचदा शिक्षकांच्या मागणीसाठी निवेदन दिलेले आहेत. तसेच संबंधीत कार्यालयातही सुचना दिल्या आहेत; मात्र अद्यापही येथे वरील रिक्त पद भरण्यात आले नाही. यासंदर्भात केंद्रप्रमुख डॉ. निर्मला जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेतील रिक्त पदाचे अहवाल संबंधीतांना वेळोवेळी सादर केले असल्याचे सांगीतले.

Web Title: One teacher from the first to the fifth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.