बळीराजा पॅनलचा एकतर्फी विजय
By Admin | Updated: May 26, 2015 02:25 IST2015-05-26T02:25:35+5:302015-05-26T02:25:35+5:30
चिखली कृउबास निवडणूक; सेनेच्या पवारांनी राखली भाजपाची लाज.

बळीराजा पॅनलचा एकतर्फी विजय
चिखली (बुलडाणा ) : संपूर्ण जिल्हय़ाचे लक्ष वेधलेल्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वातील बळीराजा पॅनलने प्रतिस्पर्धी शिवराणा तसेच भाजपा व शेतकरी संघटना प्रणीत पॅनलचा धुव्वा उडवित एकूण १८ पैकी १७ जगांवर दणदणीत एकतर्फी विजय मिळवित राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या संस्थेवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर या निवडणुकीत भाजपा व शेतकरी संघटना प्रणीत पॅनलच्या माध्यमातून हमाल-मापारी मतदारसंघातून निवडणूक लढविणारे शिवसेनेचे गजानन मापारी यांनी विजय मिळविला आहे.
गत निवडणुकीत आ. राहुल बोंद्रे यांनी प्रस्थापित दिग्गज नेतेमंडळींविरोधात स्वत:च्या नेतृत्वात निवडणूक लढवून बाजार समितीत एकहाती सत्ता मिळविली होती. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत सहकारातील दिग्गज नेते माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, जनुभाऊ बोंद्रे, भारत बोंद्रे, बाबुराव पाटील व ऐनवेळी हातमिळवणी केलेले माजी आमदार धृपदराव सावळे यांनी पक्षीय जोडे बाहेर काढून आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत बळीराजा पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली. तर काँग्रेसचेच माजी जि.प. अध्यक्ष तथा शिवराणा मित्रमंडळाचे संस्थापक प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, आ.डॉ. शशिकांत खेडेकर, उपजिल्हाप्रमुख डॉ. प्रतापसिंग राजपूत यांच्याशी हातमिळवणी करून बळीराजा पॅनलविरोधात शिवराणा पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत मांड ठोकली होती.