पाळा आश्रमशाळा विनयभंग प्रकरणात एकास ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
By अनिल गवई | Updated: September 19, 2025 23:26 IST2025-09-19T23:26:06+5:302025-09-19T23:26:53+5:30
उर्वरित १७ आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

पाळा आश्रमशाळा विनयभंग प्रकरणात एकास ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव(जि. बुलढाणा): पाळा आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील विनयभंग प्रकरणात एक आरोपी इत्तुसिंगला काळुसिंग पवार (रा. उमरा ता. खामगाव) यास दोषी ठरवून पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि १०,००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास १५ महिन्यांच्या अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. उर्वरित १७ आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
ही शिक्षा भारतीय दंड संहिता कलम ३५४ आणि कलम ३५४ (ए) (झेड) अन्वये ठोठावण्यात आली असून, कलम ३५४ (ए)(झेड) अंतर्गत दोषी आरोपीस तीन वर्षांची सश्रम कारावासाची स्वतंत्र शिक्षा आणि १०,००० रुपये दंड सुनावण्यात आला आहे. सदर दंड न भरल्यास ७ महिन्यांचा अतिरिक्त कारावास होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व शिक्षा एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश . जाधव यांनी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा निकाल दिला. या प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
साक्षी व पुराव्यांवर आधारित निर्णय
या बहुचचिर्त प्रकरणात सात साक्षीदार तपासण्यात आले, त्यापैकी पीडित विद्यार्थीनी, तिची प्रत्यक्ष साक्षीदार बहिण आणि वडील यांची साक्ष निर्णायक ठरली. सरकारी अभियोक्ता ॲड. राजेश्वरी अजय आळशी यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. सदर गुन्ह्याची चौकशी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर यांनी केली होती. सन २०१६ मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात आरोपींची संख्या आणि घटनेचा संबंध आश्रमशाळेशी असल्याने तेव्हा राज्यभर मोठी खळबळ उडाली होती.