लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चुलत वहिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका नराधमास सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. याप्रकरणी १० साक्षीदार तपासण्यात आले. खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांनी शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.संग्रामपूर तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय विवाहिता ६ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान तान्हुल्या बाळाला दूध पाजत होती. त्यावेळी दुसरा मुलगा तिच्या जवळच होता. दरम्यान, घरी कुणी नसल्याची संधी साधत, नात्याने चुलत दीर असलेल्या नराधमाने तिच्या खोलीत प्रवेश केला. तोंड दाबून, पाठीवर आणि तोंडावर मारहाण करीत जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी आरोपी शे. शाहेद नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर, जिल्हा सत्र न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांनी आरोपीस कलम ३७६ मध्ये सात वर्षांची शिक्षा सुनावली. तर, कलम ३२३ आणि ५०६ मध्ये प्रत्येकी एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. सर्व शिक्षा आरोपीस एकाचवेळी भोगावयाची असून दीड वर्षांपासून तो कारागृहात होता. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. राजेश्वरी अजय आळशी यांनी काम पाहिले.
वहिनीवर अत्याचार करणाऱ्या दिरास सात वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 12:05 IST