जीपच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:19 IST2017-07-20T00:19:41+5:302017-07-20T00:19:41+5:30

मलकापूर : भरधाव काळी-पिवळी टॅक्सीच्या धडकेत ३० वर्षीय युवक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना १८ जुलैच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

One killed in a jeep | जीपच्या धडकेत एक ठार

जीपच्या धडकेत एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : भरधाव काळी-पिवळी टॅक्सीच्या धडकेत ३० वर्षीय युवक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना १८ जुलैच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. नांदुरा रस्त्यावरील यशवंतनगरातील रामवाडी प्रवेशद्वारासमोर हा अपघात घडला.
श्याम सत्यनारायण झंवर (वय ३०) हा युवक रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याच्या नांदुरा रस्त्यावरील राहत्या घरासमोर उभा होता. तेवढ्यात नांदुऱ्यावरून मलकापुरात भरधाव आलेल्या काळी-पिवळी क्र.एम.एच.३०- ई ९१७१ या टॅक्सीने उडविले. काळी पिवळीची धडक इतकी जबरदस्त होती की, श्याम झंवर यांच्या डोक्याला व पायाला गंभीर जखमा झाल्या. त्याला नगरसेवक सुनील गांधी व पंकज खराडे यांनी तत्काळ उपचारासाठी बुलडाणा येथे हलविले असता, मोताळ्यानजीक त्याची प्राणज्योत मालवली. यावेळी विजय राधाकिसन गांधी (वय ५०) हेदेखील जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी काळी-पिवळी टॅक्सीचालक राजू हरिभाऊ संबारे (वय ३२) रा.लक्ष्मी नगर यास अटक केली. त्याच्या विरुद्ध अ‍ॅड.अशोक त्र्यंबक खर्चे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम २७९,३३७,३०४ (अ) भादंविचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One killed in a jeep