शेगाव (जि. बुलडाणा): अमरावती परिक्षेत्रातील वन्य जीवांच्या शिकार प्रकरणातील फरार आरोपीस शुक्रवारी शेगावात अटक करण्यात आली. खामगाव वनपरीक्षेत्र अधिकारी व शेगाव पोलीस यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.अमरावती वनपरीक्षेत्रामध्ये घोरपडची शिकार केल्याप्रकरणी पिंपळखुटा येथील विलास रामकृष्ण डहाके याच्याविरुध्द अमरावती पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर अपराधामधील आरोपी विलास डहाके हा शुक्रवारी सकाळी संशयास्पदरित्या फिरतांना आढळुन आला. पोलीस अधिकारी दुतोंडे यांनी त्यास विचारपुस केली. पोलिसांना विलास डहाके याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेतले. दरम्यान खामगांव वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी पोलिसांना दिलेली माहिती आरोपी संदर्भात जुळत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याबाबतची माहिती खामगांव वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एन.साळुंके यांना दिली. आरोपीबाबतची माहिती मिळताच साळुंके यांनी वनविभागाच्या स्टाफसह शेगाव गाठले. व शहर पोलीस स्टेशनकडून आरोपीला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शहर पीएसआय विलास दुतोंडे, पोकॉ मापारी, पोकॉ वानखडे, वनविभागाचे वनपाल एच.एम. गिते, वनरक्षक एस.आर.गिरनारे, एस.पी.काकडे, भोनगांव बिटचे वनरक्षक डि.जी.शेगोकार यांनी पार पाडली.
घोरपड शिकार प्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 02:11 IST