दीड हजारांवर प्रस्ताव गहाळ!
By Admin | Updated: August 3, 2015 01:40 IST2015-08-03T01:40:42+5:302015-08-03T01:40:42+5:30
लाभार्थ्यांची यादी मिळेना : दलालांचीही होणार चौकशी, मोठे मासे लागणार गळाला.

दीड हजारांवर प्रस्ताव गहाळ!
सिद्धार्थ आराख / बुलडाणा : अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या बुलडाणा कार्यालयाच्या माध्यमातून विविध योजनांवर कोट्यवधी रुपयांच्या दाखविण्यात आलेल्या खर्चाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीला कर्जप्रकरणाचे १५00 प्रस्ताव कार्यालयात आढळले नाहीत. सन २0१३-१४ आणि २0१४-१५ या अर्थिक वर्षात विविध नऊ योजनावर १५ ते २0 कोटी रु पये असा अवाढव्य खर्च झाला. शासनाकडून आलेला हा निधी खर्च करताना संबंधित योजनेची कर्जप्रकरणे परिपूर्ण करून जिल्हा समितीची त्यावर मंजुरात घ्यावी लागते. त्यानंतर ही प्रकरणे विभागीय कार्यालयाकडे, तर काही योजनामध्ये आवश्यकता वाटल्यास मुंबईला पाठवावी लागतात; मात्र मूळ प्रस्ताव हे जिल्हा कार्यालयातच असतात. असे असताना अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या बुलडाणा कार्यालयाने योजनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असताना जिल्हा कार्यालयात एकाही लाभार्थ्यांचा प्रस्ताव समितीला दिसून आला नाही. हे १५00 पेक्षा जास्त प्रस्ताव गहाळ झाले आहेत. लाभार्थ्यांच्या याद्यासुद्धा समितीला उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, याप्रकरणी आता दलालांची गुप्तचर विभागाकडून चौकशी होणार असल्याचे संकेत मिळाले असून, मोठे मासे गळाला लागणार असल्याचे समजते.