विवाह सोहळ्यांवर वाढले पुन्हा एकदा कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST2021-04-08T04:34:25+5:302021-04-08T04:34:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राहेरी : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच हातमजूर अडचणीत सापडले आहेत. अनलॉकनंतर आता कुठे ...

विवाह सोहळ्यांवर वाढले पुन्हा एकदा कोरोनाचे सावट
लोकमत न्यूज नेटवर्क
राहेरी : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच हातमजूर अडचणीत सापडले आहेत.
अनलॉकनंतर आता कुठे सर्वच व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत होते; मात्र पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यामुळे सुरू झालेले व्यवहार, उद्योग पुन्हा संकटात सापडले आहेत. या कडक निर्बंधांमुळे विवाह सोहळ्यांवर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.
अगोदरच लग्नकार्य, धार्मिक सोहळे यासह इतर अनेक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याने निगडीत सर्व व्यवसायांवर संकट आले आहे. आता परत एकदा घातलेल्या मर्यादेमुळे पुन्हा व्यवसाय अडचणीत आला असून, यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेने सर्वांना घेरले आहे, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्न सोहळा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या सोहळ्यात माणूस कोणतीही तडजोड करत नाही. आयुष्यात लग्न एकदाच होते. त्यामुळे ते धुमधडाक्यात व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अलिकडे लग्न ही घरासमोर न करता, लॉन्स किंवा मंगल कार्यालयात केली जातात. त्याठिकाणी सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतात तसेच कुटुंबातील व्यक्तींची धावपळ होत नाही. लॉन्सचा मालक वाद्य, जेवण, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, मंत्रघोष करणारा पुजारी, जेवणाची सर्व सोय, पाहुण्यांची देखभाल करणारे केटरर्स, हार-पुष्पगुच्छ, छायाचित्रकार, आर्केस्ट्रा असे सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे सर्वात जास्त कल हा लाॅन्सवर लग्न करण्याकडे असतो. एका लग्नावर जवळपास दहा व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब आणि आर्थिक बजेट सर्व याच व्यवसायावर अवलंबून असते. शिवाय लॉन मालकाला विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात. यंदा मात्र जवळपास एक वर्ष लग्नसोहळे बंद होते. लग्नसोहळे थोडक्या माणसात साजरे करण्याचे फर्मान काढल्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आताच्या घडीला लग्नप्रसंगीसुद्धा वऱ्हाडी मंडळी मास्क न घालता बेफिकिरी दाखवत आहेत. म्हणून आपणच कोराेना संक्रमण वाढीसाठी जबाबदार आहोत; पण एका सोहळ्यावर अनेक व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे लग्न समारंभ साजरे करण्यासाठी नियमांचे कठोर पालन करून उद्योग सुरू ठेवण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत.
गेल्यावर्षीपासून कोविडमुळे लग्न समारंभाला मर्यादा आल्यामुळे आमच्या बिछायत केंद्र व्यवसायावर फार मोठे संकट आले असून, आमचा बिछायत केंद्र व्यवसाय २० टक्क्यांवरच आला आहे. तरी मला यामुळे किराणा दुकान पर्याय म्हणून सुरू करावे लागले आहे.
अशोकराव सोनुने, बिछायत केंद्र, राहेरी बु.