शेगाव पालिकेची जुनी इमारत भस्मसात

By Admin | Updated: March 20, 2017 03:08 IST2017-03-20T02:15:47+5:302017-03-20T03:08:17+5:30

लक्षावधी रुपयांच्या सागवानाचा झाला कोळसा

The old building of Shegaon municipality was destroyed | शेगाव पालिकेची जुनी इमारत भस्मसात

शेगाव पालिकेची जुनी इमारत भस्मसात

शेगाव, दि. १९- शेगाव बसस्थानकाजवळील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीला रविवारी सायंकाळी आग लागली. या आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाली असून, १00 वर्षांपूर्वीच्या इमारतीमधील लाखो रुपयांचे सागवान लाकूड जळले आहे.
शेगाव बसस्थानकासमोरील नगरपालिकेची जुनी इमारत असून, सध्या ही इमारत बंद होती. काही वर्षांपर्यंत या इमारतीत सहायक निबंधक कार्यालय कार्यरत होते; मात्र या कार्यालयाचे स्थानांतरण झाल्यापासून ही इमारत बंद आहे. दरम्यान, या रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास या बंद इमारतीला अचानक आग लागली. या आगीने पाहता-पाहता संपूर्ण इमारतीला वेढा घातला. घटनेची माहिती न.प. च्या अग्निशमन दलाला मिळाल्यावरून त्यांनी घटनास्थळ गाठून आग विजवण्यासाठी पाण्याचा बंब सुरु केला; मात्र अपुरा असलेला पाइप आणि अग्निशमन वाहनात असलेले थोडेसे पाणी ५ मिनिटात संपले. यामुळे सदर वाहन पाणी भरण्यासाठी निघून गेले. त्यानंतर ४५ मिनिटे आग धगधगत राहिली. ७.३0 च्या सुमारास पुन्हा शेगाव न.प.चे अग्निशमन दल आणि खामगाव न.प.चे अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. मुख्य बाजारात ही आग लागल्याने परिसरातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील सामान खाली केले होते. दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीकडून या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.

जमावावर सौम्य लाठीचार्ज
लागलेली आग पाहण्यासाठी बाजार समिती परिसरात नागरिकांनी एकाच गर्दी केली होती. अश्यावेळी अग्निशमन दल येईल, यासाठी जागा खाली करून घेण्यासाठी शहर पोलीस स्टेशनमध्ये बंदोबस्ताकामी आलेल्या राखीव पोलीस दलाच्या जमावाने नागरिकांवर सौम्य लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ठाणेदार यशवंत बाविस्कर यांना ही बाब समजताच त्यांनी राखीव जवानांची कानउघडणी केली. लाठीचार्ज करण्याचे कोणतेच आदेश दिलेले नसताना जवानांनी हा प्रकार केल्याचे समजते.

आग लावली असण्याची चर्चा
न.प.च्या या जुन्या इमारतीला आग लागली नसून, ती लावण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. या भागात अवैध व्यवसाय सुरु करण्यासाठी ही इमारत जाळण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीत विद्युत पुरवठा नसताना आणि सर्व दरवाजे बंद असताना आग लागण्याचे कारण दुसरे असूच शकत नसल्याचा दावा नागरिक करीत आहेत.







 

Web Title: The old building of Shegaon municipality was destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.