शासकीय कार्यालय कागदपत्रे असुरक्षित
By Admin | Updated: August 7, 2015 01:09 IST2015-08-07T01:09:27+5:302015-08-07T01:09:27+5:30
कर्मचा-यांची अनुपस्थिती; फाईली बेवारस, तर कोठे पाण्यामुळे दस्तऐवज ओले.
_ns.jpg)
शासकीय कार्यालय कागदपत्रे असुरक्षित
बुलडाणा : गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे स्थानिक शासकीय कार्यालयातील महत्त्वाच्या नागरी कागदपत्रांना मोठा फटका बसला आहे. शिवाय ग्रा.पं.निवडणूक निकालामुळे बऱ्याच ठिकाणी कर्मचारी कामाच्या वेळी गैरहजर असल्यामुळे विविध शासकीय कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे असुरक्षित असल्याचे आज केलेल्या स्ट्रिंग आॅपरेशनमध्ये आढळून आले.
आज ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी स्थानिक तहसील कार्यालयात सुरु होती. त्यामुळे शहरातील विविध शासकीय कार्यालयातील बरेच कर्मचारी आपआपल्या उमेदवारांच्या निकाल एैकण्यासाठी कार्यालयाला दांडी मारुन गायब होते. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या टेबलावर महत्वाच्या कामाच्या फाईली व कागदपत्र तसेच पडून असल्याचे आढळले. शिवाय जिल्हा मुख्यालयातील विविध शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट होता.
शासकीय कार्यालयात फेरफटका मारला असता प्रामुख्याने असुरक्षित स्थिती आढळून आली. शिवाय दोन दिवसाच्या पावसाचा बऱ्याच कार्यालयांना फटका बसलेला आढळून आला. बऱ्याच कार्यालयास पाण्याची गळती लागल्यामुळे कपाटातील व आरमारीवर बांधून ठेवलेली महत्वाची दस्तऐवज पाण्यामुळे ओली झालेली आढळून आली. मात्र स्थानिक प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे.