कोविड सेंटरसाठी अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST2021-04-25T04:33:41+5:302021-04-25T04:33:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क साखरखेर्डा : परिसरामधील वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता, साखरखेर्डा येथे कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर ...

कोविड सेंटरसाठी अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : परिसरामधील वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता, साखरखेर्डा येथे कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर व्हावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवारी शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार विद्यामंदिराची पाहणी केली. या जागेला सहकार विद्यामंदिराचे अध्यक्ष हिरवा झेंडा दाखवणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
साखरखेर्डा येथे कोविड सेंटर झाले तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत होईल, अशी मागणी पालकमंत्री डॉ . राजेंद्र शिंगणे यांच्याकडे काही नागरिकांनी केली होती. त्यादृष्टीने पालकमंत्र्यांनी होकार दिला हाेता़. अगोदर स्थानिक लोकप्रतिनिधींनी श्री पलसिद्ध संस्थान येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीची पाहणी केली होती. परंतु, श्री पलसिद्ध संस्थान हे साखरखेर्डा गावातच येत असल्यामुळे तिथे कोविड सेंटरची उभारणी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे नवीन जागेचा शोध सुरू झाला. साखरखेर्डा येथील सहकार विद्यामंदिरची कोविड सेंटर उभारण्यासाठी २३ एप्रिलला पाहणी करण्यात आली. यावेळी सिंदखेडराजा पंचायत समितीचे तहसीलदार सुनील सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्रकुमार साळवे, गटविकास अधिकारी गुणावंत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे, ठाणेदार जितेंद्र आडोळे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ जाधव, सरपंच दाऊद कुरेशी, तलाठी मांडगे, तलाठी शिंगणे, तलाठी पवार, ग्रामसेवक, माजी सरपंच कमलाकर गवई, आदी उपस्थित हाेते.