Obstruction of foodgrains from the Center in Khamgaon! | केंद्राकडून आलेल्या धान्याची खामगावात अडवणूक!

केंद्राकडून आलेल्या धान्याची खामगावात अडवणूक!

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: केंद्र शासनाकडून रेशन लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी पाठविण्यात आलेले धान्य उतरविण्यासाठी खामगाव येथील गोदामावर पाच दिवसांपासून अडवणूक होत आहे. धान्य उतरविण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने हतबल झालेल्या कंत्राटदाराने याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली आहे.
भारतीय खाद्य निगमने खामगाव येथे रॅकद्वारे धान्य आणण्यासाठी अतिरिक्त पैसे लागतात. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून रोडलाईन्सद्वारे गहू आणण्यासाठी वाहतूक कंत्राटदार कंपनीशी कंत्राट केला आहे. त्यानुसार मध्यप्रदेशातील सिंग गोल्डन ट्रान्सपोर्ट कंपनीने भारतीय खाद्य निगमच्या खामगाव (टेंभूर्णा) येथील गोदामावर रविवारी २९ टन धान्य वाहतूक करणारे ४ ट्रक पाठविले. टप्प्या-टप्प्याने काही ट्रक गोदामावर आले. गोदामावर आलेल्या ट्रकमधून धान्य उतरविण्यासाठी तसेच ट्रकचे वजन करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने करारबध्द केलेल्या ब्लॅक स्टोन वे ब्रिज लॉजीस्टिक व्यवस्थापनाने साफ नकार दिला.

धान्य वाहतुकीचा कंत्राट गेल्याने आडमुठे धोरण!
रेल्वेने धान्य आल्यानंतर रेल्वे स्टेशनपासून गोदामापर्यंत धान्य आणण्याचा कंत्राट ब्लॅक स्टोन लॉजीस्टिकची उपकंपनी असलेल्या सबलाईन ट्रॉन्सपोर्ट कंपनीकडे होता. आता रोडलाईन्सद्वारे धान्य वाहतूक केली जाते. गोदामावर ब्लॅक स्टोन लॉजीस्टिककडून अडवणूक होत असल्याची चर्चा आहे.


धान्य उतरविण्यासाठी ७० रूपये प्रती टन आकारणी!
गोदामावर धान्य उतरविण्यासाठी शासनाकडून पैसे मिळत असतानाही इंदौर येथून धान्य आणणारांची अडवणूक करण्यासाठी सुरूवातीला १०० रूपये प्रतिटन दराची मागणी करण्यात आली. या मागणीला कंत्राटदाराने नकार दिल्यानंतर ७० रूपये प्रति टनानुसार आकारणी केली जाते. धान्य उतरविण्यासाठी दर आकारणे नियमबाह्य असल्याची चर्चा आहे.

पाच दिवसांपूर्वी आलेले धान्य उतरविण्यात न आल्याने संबंधितांना नोटीस दिली आहे. धान्य का उतरविले नाही, अशी विचारणा ब्लॅक स्टोन लॉजीस्टिककडे करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी दुपारी दोन ट्रकचे वजन करून धान्य उतरविण्यात आले आहे. लवकरच हा तिढा सोडविला जाईल.
- बी.एफ. भंवर, साठा अधिक्षक,
भारतीय खाद्य निगम, टेंभूर्णा गोदाम.


मध्यप्रदेशातून खामगाव येथील गोदामावर रविवारी धान्य आणण्यात आले आहे. धान्य उतरविण्यासाठी खामगाव येथील गोदामावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अडवणूक केली जात आहे. धान्य उतरविण्यास पाच दिवसांपासून टाळाटाळ केली जात असल्याने कोरोना संचारबंदी काळात उपासमार होत आहे.
- रविंद्रसिंह चौहाण, ट्रक चालक, सिंग गोल्डन ट्रान्सपोर्ट, इंदौर,मध्यप्रदेश

 

Web Title: Obstruction of foodgrains from the Center in Khamgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.